एकाच सरणावर बाप-लेकाला भडाग्नी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

दुर्धर आजाराला वडील झुंज देत असल्याचे दुःख असह्य झालेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर वडिलांचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गोपेगाव (ता. पाथरी) येथे वीस सप्टेंबरला घडली. गावकऱ्यांनी शोकाकुल वातावरणात एकाच सरणावर बाप-लेकाला भडाग्नी दिला.

पाथरी - दुर्धर आजाराला वडील झुंज देत असल्याचे दुःख असह्य झालेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर वडिलांचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गोपेगाव (ता. पाथरी) येथे वीस सप्टेंबरला घडली. गावकऱ्यांनी शोकाकुल वातावरणात एकाच सरणावर बाप-लेकाला भडाग्नी दिला.

गोपेगाव येथील रहिवासी विलास किशनराव गिराम (वय ५६) हे परभणी येथील शिवाजी महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. पत्नी, दोन मुलांसह ते परभणी येथे ते राहत होते. गेल्या नऊ महिन्यांपासून ते आजाराने त्रस्त होते. आजार दिवसेंदिवस बळावतच चालला होता. त्यांचा अक्षय नावाचा मुलगा औरंगाबाद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करून परभणी येथे आला होता. दुसरा मुलगा नाशिक येथे शिक्षण घेत आहे. वडिलांची प्रकृती अधिकच खालावत जात असल्यामुळे अभियंता झालेला मुलगा अक्षय अस्वस्थ होता. वीस सप्टेंबरला दुपारी विलास गिराम यांची प्रकृती अधिकच ढासळली. घरातील नातेवाइकांनाही काही कळेनासे झाले. मेडिकलमधून औषध आणतो, असे सांगून सायंकाळी अक्षय दुचाकीवरून बाहेर पडला. काही वेळात विलास गिराम यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे दीड तास होऊन गेला तरी त्यांचा अक्षय घरी परत आला नाही. मामाला घरी ठेवून कल्याण गिराम (विलास यांचे बंधू) हे भावाचा मृतदेह परभणीहून मूळ गावी घेऊन आले.

दरम्यान, नातेवाइकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेतला असता, अक्षय गिरामचाही मृतदेह सापडला. विलास यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्याच्या वेळी अक्षयचा मृतदेह गावात दाखल झाला. त्यावेळी गिराम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. एकाच वेळी, एकाच सरणावर बाप-लोकाचा अंत्यविधी करण्यात आला. 
वडिलांची प्रकृती ढासळत असल्याने अक्षयच्या मनावर मोठा आघात झाला.

मेडिकलवर जात असल्याचे सांगून त्याने परभणी कृषी विद्यापीठ गाठले. विद्यापीठ परिसरातील एका झाडाच्या बाजूला दुचाकी लावली. शर्टद्वारे झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by Health Problem Death funeral