चारित्र्यावर संशय घेत गर्भवती महिलेच्या पोठावर घातल्या लाथा; महिलेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

- सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या विवाहितेची आढळली  सुसाईड नोट
- गर्भवती असताना सासरच्या मंडळींनी पोटावर मारल्या लाथा
- नेहमी चारित्र्यावर घेतला जात होता संशय

बीड : सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या विवाहितेची सुसाईड नोट आढळली आहे. गर्भवती असताना सासरच्या मंडळींनी पोटावर लाथा मारल्या आणि गर्भपात केला. चारित्र्यावर नेहमी संशय घेतला जात होता, असे दिपाली शितोळे हीने आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

बीड शहरातील अजीजपुरा भागातील शिराळे गल्लीतील दिपाली शितोळे हीने रविवारी (ता. २१) दुपारी राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केली. दिपालीचा रोहित शिराळेसोबत (ता. २६) एप्रिलला विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर चारित्र्यावर संशय घेण्यासह माहेरहून घरबांधणीसाठी दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता. यामुळे तिने रविवारी आत्महत्या केली.

लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत दिपालीच्या चारित्र्यावर संशय घेत सासू, सासरा, नवरा तिला मानसिक तसंच शारीरिक त्रास देऊ लागले. दिपालीने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतून हा प्रकार समोर आला आहे. 'माझा नवरा, सासू, सासऱ्यांनी लग्नाच्या तीन महिन्यांनंतर माझा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. मी  सहा आठवड्यांची गर्भवती असताना माझ्या पोटावर लाथा मारून  मला घरातून बाहेर काढले. मला बळजबरीनं गर्भपात करायला लावला. माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना लग्न थाटात केलं. पण या सर्वांनी माझ्यावर संशय घेत छळ केला. ते माझी  हत्या करून या घटनेस आत्महत्या असल्याचं दाखवू शकतात. मला या त्रासातून मुक्त करा', अशी माहिती दिपालीनं चिठ्ठीत लिहिली आहे.

तीने माहेरी (शिवणी, ता. बीड) येथे लिहलेली मृत्यूपूर्व चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. दीपालीचा भाऊ शिवराम शिंदे (रा. शिवणी, ता. बीड) यांच्या फिर्यादीवरुन पती रोहित शिराळे याच्यासह सासू आाशाबाई शिराळे, मारूती शिराळे, दीर राज शिराळे व नणंद मीरा सुपेकर (सर्व रा. अजिजपुरा,बीड) यांच्याविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार मनीषा जोगदंड या करत आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suicide note stands a proof for Femicide

टॅग्स