सुपारी किलर इम्रान मेहंदी येरवडा तुरुंगातून ताब्यात

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

पोलिसांच्या तावडीतून निसटण्यासाठी रचला होता कट 

औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी "सुपारी किलर' इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता.11) पुणे येथील येरवडा तुरुंगातून ताब्यात घेत अटक केली. त्याला शनिवारी (ता.12) न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारपर्यंत (ता.14) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आय. के. सूर्यवंशी यांनी दिले. 

प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण 16 आरोपींना अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच प्रकरणात 15 आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. 
इम्रान मेहंदीचे जामिनावर सुटलेले साथीदार हबीब खालेद हबीब मोहंमद ऊर्फ खालेद चाऊस आणि मोहंमद शोएब मोहंमद सादेक हे कट रचून इम्रान मेहंदीला पोलिस संरक्षणातून पळवून नेणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. याआधारे 27 ऑगस्ट 2018 रोजी गुन्हे शाखा पोलिसांनी नारेगाव (जि. औरंगाबाद) चौकात सापळा रचून दहा जणांना पकडले. त्यांच्याकडून एक पिस्टल, काडतुसे, दोन कार आणि मोबाईल देखील यावेळी जप्त करण्यात आले. प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी पोलिसांनी 16 आरोपींना अटक केली. तर न्यायालयाने पोलिस कोठडीनंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. 

कटात समाविष्टांची यादी मोठी 
दरम्यान, पोलिसांनी सदर गुन्ह्यात आरोपी इम्रान मेहंदी याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी आरोपी इम्रान याने साथीदारांच्या मदतीने स्वत: च्या सुटकेचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. गुन्ह्याचा कट कसा रचला व त्यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे, त्यांना कोणी मदत केली याबाबत तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपी मेहंदीला सोमवारपर्यंत (ता.14) पोलिस कोठडी सुनावली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supari Killer Imran Mehandi arrested from Yerwada jail