हिंगोलीत आदिवासी प्रकल्पाचा सुपर फिफ्टी फार्म्युला

मंगेश शेवाळकर
बुधवार, 12 जून 2019

  • दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार नीटच्या तयारीची संधी
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे स्वप्न होणार पूर्ण
  • खाजगी क्लासेसमध्येही प्रवेश दिला जाईल

हिंगोली : कळमनुरीच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुपर फिफ्टीचा फार्म्युला तयार केला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश परिक्षा घेऊन त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे आदिवासी आश्रमशाळेत प्रवेश देऊन नीट परिक्षेच्या तयारीला संधी दिली जाणार आहे. त्यातून आदिवासी विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

कळमनुरी आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या पाच आदिवासी आश्रमशाळांचा दहावीचा निकाल साठ टक्केपेक्षा अधिक लागला आहे. जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार व होतकरू असून त्यांना आता पुढे काय करावे याचे वेळेवर मार्गदर्शन मिळत नाही. तर बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक शेती व मजूरी करीत असल्याने त्यांनाही पुरेशी माहिती मिळत नाही. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अकरावी व बारावी करून पदवी परिक्षेचे शिक्षण घेण्याची वेळ येत असल्याचे चित्र आहे. 

दरम्यान, जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळेतील या हुशार विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी सुपर फिफ्टी फार्म्युला तयार केला आहे. यामध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची ता. 17 जून ते ता. 28 जून या कालावधीत प्रवेश परिक्षा घेतली जाईल. या परिक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथील आदिवासी आश्रमशाळेत अकरावी वर्गात प्रवेश दिला जाईल. त्यानंतर त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना सीईटी व नीटच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी खाजगी क्लासेसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पुढील दोन वर्षात या विद्यार्थ्यांची सीईटी व नीटची तयारी करून घेतली जाणार आहे. त्यातून या विद्यार्थ्यांचे वैद्यकीय अभ्यासक्रम व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी देण्याचे प्रयत्न : डॉ. विशाल राठोड, प्रकल्पाधिकारी
जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालयातून होतकरू व हुशार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची संधी मिळवून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: super fifty formula to help the tribal students who have passed tenth standard for preparing NEET