गुप्तधनासाठी बळी देण्याचा डाव उधळला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - गुप्तधनासाठी मुलीची नग्नपूजा करून तिचा बळी देण्याचा अघोरी प्रकार थांबविण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश आले आहे. फुलंब्री तालुक्‍यातील रांजणगाव येथे समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी (ता. 24) केलेल्या कारवाईत तिघांना ताब्यात घेतले. त्यामुळे गुप्तधनासाठी अंधश्रद्धेतून होणारा मोठा गुन्हा थांबला. शिवाय, एका मुलीचे प्राणही वाचले. 

रांजणगाव येथील डिगंबर कडूबा जाधव यांच्या शेतातील राहत्या घरी गुप्तधन असून ते आपण काढून देऊ, असे आमिष बाळू गणपत शिंदे या मांत्रिकाने जाधव यांना दाखविले. त्यासाठी दोन लाखांची बोली ठरली होती. त्यानुसार दोन टप्प्यांत प्रत्येकी 74 हजार रुपये मांत्रिकाने घेतले होते. उर्वरित रक्कम पूजेनंतर, गुप्तधन काढल्यावर देण्याचे ठरले होते. ठरल्यानुसार मांत्रिकाने मंगळवारपासून (ता. 21) पूजेची तयारी सुरू केली होती. सुरवातीला मांत्रिक शिंदेने जाधव यांच्या घरातून एक मूर्ती काढून दिली. आज रात्री पूजा करून तो गुप्तधन काढून देणार होता. त्यासाठी सकाळपासूनच हळद-कुंकू, कापडाचे तुकडे, मूर्ती, तांब्याची भांडी आदी साहित्याची जुळवाजुळव झाली होती. एका तांब्याच्या हंड्यात माती भरून ठेवण्यात आली होती. या कामात शिंदेला इमामखॉं हसनखॉं पठाण (रा. जालना जिल्हा) मदत करीत होता. या हालचालींची कुणकुण लागताच "अंनिस'च्या कार्यकर्त्याने राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांना माहिती दिली. भोसलेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी फुलंब्री पोलिसांना सोबत घेऊन तातडीने रांजणगाव गाठले आणि हा प्रकार रोखला. 

रांजणगावात मांत्रिकाच्या माध्यमातून गुप्तधन शोधण्यासाठी एका मुलीची नग्नपूजा केली जाणार होती. या संदर्भात एका कार्यकर्त्याकडून माहिती मिळताच तत्काळ गावात जाऊन, पोलिसांच्या मदतीने आम्ही हा प्रकार रोखला. 
- शहाजी भोसले, राज्य सरचिटणीस, अंनिस 

Web Title: Superstition in aurangabad for hidden treasure

टॅग्स