भरपावसाळ्यात बेळंबला टॅंकरने पाणीपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

उस्मानाबाद ः राज्याच्या अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी उस्मानाबाद जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने परिसरातील तलाव, नदी, नाले, विहिरी, कूपनलिका अद्यापही कोरडेच आहेत. पावसाळ्यातही बेळंब (ता. उमरगा) गावाला टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. तर केसरजवळगा, कोथळी, आलूर, वरनाळ, कंटेकुर या गावांत अधिग्रहण केलेल्या कूपनलिकांतून पाणीपुरवठा सुरू आहे.

राज्यात एकीकडे अनेक धरणे ओव्हरफ्लो होत असून, अनेक नद्यांना पूर आला आहे. या पुराचा फटका अनेक गावांना बसला आहे. तर दुसरीकडे पाऊस पडू दे म्हणून परिसरातील नागरिक दररोज ईश्वराकडे प्रार्थना करीत आहेत. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका केसरजवळगा परिसराला बसला आहे. सलग दुसऱ्या वर्षी अपुरा पाऊस झाल्याने याचा फटका खरीप पिकांना बसला आहे. प्रामुख्याने माळरानावरील पिकांनाच मोठ्या प्रमाणात बसला आहे. पिकांची वाढ खुंटली असून, अनेकांची पिके वाया गेली आहेत. चांगल्या प्रतीच्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांची पिके तग धरून आहेत. अपुऱ्या पावसामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे.

सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकरी पीक वाचविण्यासाठी महागड्या औषधींची फवारणी करीत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या ओलीवर परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली आहे. पेरणीनंतर अधूनमधून झालेल्या पावसामुळे पिके तग धरून आहेत; मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले तरी परिसरातील नदी, नाले, विहिरी, तलाव, कूपनलिका अद्यापही कोरड्याच आहेत. आगामी काळात तरी चांगला पाऊस पडावा नदी, नाले, तलाव, विहिरी, कूपनलिका ही पाण्याची क्षेत्र तुडुंब भरभरून वाहू दे, अशी प्रार्थना परिसरातील शेतकरी ईश्वराकडे करीत आहेत.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supply of tanker water even during monsoon