` त्या ` मुलीला ` यांनी ` दिला आधार

file photo
file photo

परभणी : होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रीसर्च आणि चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेने एका दुर्धर आजारग्रस्त मुलीचे पालकत्व स्वीकारत पोषण आहारासह उपचार आणि शिक्षणाचा खर्च उचलला आहे. तर अन्य एका युवतीला स्वत: पायावर उभे राहण्यासाठी संगणकाची भेट दिली आहे.

एचएआरसी संस्थेच्या  बालदिननिमित्त आयोजित  कार्यक्रमात चाईल्डलाईनच्या दुर्धर आजारग्रस्त अनाथ मुलीला मदतीची गरज असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, बाळासाहेब दंडवते, दिनेश शर्मा, सोनू अग्रवाल, डॉ. शिवा आयथॉल  यांना कळताच त्यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आहे. एचआयव्ही एड्स सारख्या दुर्धर आजाराने आई- वडिलांचे छत्र हरवलेल्या १२ वर्षाच्या अनाथ मुलीस नवीन कपडे, वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य, पोषक आहार, स्वच्छता किट, ब्लॅंकेट आदी जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केले.

आजोबा करतात सांभाळ...
वडिलांच्या मृत्यूनंतर संबंधित मुलीची तपासणी केली असता तिलादेखील जन्मतःच एचआयव्हीची लागण झाली होती. सध्या तिला एआरटी विभागात मोफत औषधोपचार मिळत आहे. या मुलीचा  सांभाळ तिचे ७५ वर्षाचे वृद्ध आजोबा (आईचे वडील) अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत करीत आहेत. परंतु, वयानुसार त्या दोघांना घरखर्च चालविण्यासाठी अत्यंत आर्थिक अडचणी येत आहेत. त्यामुळे तिचे एचएआरसी टीमने १८ वर्षांची होईपर्यंत सर्वतोपरी मदत करण्यासाठी पालकत्व स्वीकारले आहे. दर महिन्याला स्वच्छता किट, पोषक आहार, जीवनावश्यक वस्तू, वर्षातून तीन वेळा नवीन कपडे, मोफत होमिओपॅथिक औषधोपचार व शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याचे ठरविले असल्याचे संस्थेने सांगितले आहे. तर अन्य एका १८ वर्षे पूर्ण झालेल्या बाधित युवतीस स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी संगणक दिले आहे. आई-वडील नसल्याने एवढे दिवस बालगृहात काढलेली युवती १८ वर्षे पूर्ण झाल्याने आता बहिणीकडे राहत आहे. तिला पुढील उदरनिर्वाहासाठी आणि शिक्षणाची जिद्द पाहून एचएआरसी संस्थेने मदत केली आहे.

२३८ मुलांना मिळाली मदत


‘एचआयव्ही’ बाधित मुलांसाठी काम करणाऱ्या या संस्थेकडून आतापर्यंत  २३८ अनाथ, एचआयव्ही व वंचित बालकांना शिक्षण, आरोग्य व पुनर्वसनपर गरजांसाठी मदत झाली आहे. तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वावलंबी बनविण्यासाठी मदत केली आहे. याच उपक्रमातून मागील सहा महिन्यांत पाच दुर्धर आजारग्रस्त  मुलींना उदरनिर्वाहसाठी शिलाई मशीन दिली आहे, तर दोन अनाथ एचआयव्हीग्रस्त मुलांना संगणक संच दिला आहे.

दानशुरांनी मदतीसाठी पुढे यावे


संस्थेच्या माध्यमातून वंचितांना मदत केली जात आहे. दानशुरांनी वायफळ खर्चाला फाटा देत अशा वंचितांमध्ये आनंद निर्माण करण्यासाठी मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असे ‘एचएआरसी’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांनी ‘सकळ’ शी बोलताना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com