भाजपचे `जुमला' सरकार अपयशी : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या यशस्विनी अभियानाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेद हा उपक्रम राबविला जात आहे. त्याद्वारे महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या वस्तूंचे वाटप तसेच शैक्षणिक पात्रतेप्रमाणे कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.

लातूर - केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार म्हणजे `जुमला' सरकार आहे. हे सरकार विविध योजनांचे मार्केटिंग करण्यात आघाडीवर आहे. पण प्रत्यक्षात कुठल्याही योजनेची अंमलबजावणी होत नाही. शेती व शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याने सरकारने असंवेदनशीलतेची परिसीमा गाठली आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लातूर येथे पत्रकार परिषदेत केली. 

खासदार सुळे म्हणाल्या, की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या यशस्विनी अभियानाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेद हा उपक्रम राबविला जात आहे. त्याद्वारे महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या वस्तूंचे वाटप तसेच शैक्षणिक पात्रतेप्रमाणे कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी साह्य केले जात आहे. त्यासाठी समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आहे. शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. कर्जमाफीचा निर्णय घेतला जात नाही. शेतीमालाला भाव मिळत नाही. सरकार फक्त जुमलेबाजी करून योजनांची मार्केटिंग करत आहे. अंमलबजावणीत अपयश आल्याने सरकार असंवेदनशील बनले आहे. केंद्र सरकारकडून डिजिटल इंडियासारख्या घोषणा होतात, पण प्रत्यक्षात संसदही वायफाय झाली नाही. 

सरकार काही निर्णय चांगले घेते. त्यामुळे त्यांना चांगलेच म्हटले पाहिजे, असे सांगून खासदार सुळे म्हणाल्या की, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, दळणवळणमंत्री नितीन गडकरी हे केंद्रात चांगले काम करतात. ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांचेही काम चांगले आहे. विशेषतः महाराष्ट्रातील मंत्री चांगली कामे करत असल्याचे त्यांनी कौतुक केले. राष्ट्रवादी सत्तेत नाही, पण समाजाच्या हितासाठी फक्त सत्ताच उपयोगी असते असे नाही. त्यामुळे नव्या उमेदीने समाजहिताची कामे करत आहोत. त्यासाठी लातूरमध्ये डॉक्‍टर मंडळी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला व पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद केल्याचे खासदार सुळे म्हणाल्या. 

याप्रसंगी आमदार विक्रम काळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, संपर्क प्रमुख जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, बबन भोसले, पप्पू कुलकर्णी, ऍड. श्रीकांत सूर्यवंशी, रेखा कदम, अरविंद कांबळे उपस्थित होते.

Web Title: Supriya Sule criticize BJP