धस यांच्या गडाला मुंडेंकडून सुरुंग?

सुधीर एकबोटे
गुरुवार, 20 एप्रिल 2017

पाटोदा - बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीला मोठा हाबाडा देत जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात देण्यासाठी पुढाकार घेतला. धस हे एकप्रकारे बीड जिल्हा परिषदेचे किंगमेकरच ठरले.

पाटोदा - बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीला मोठा हाबाडा देत जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात देण्यासाठी पुढाकार घेतला. धस हे एकप्रकारे बीड जिल्हा परिषदेचे किंगमेकरच ठरले.

या घडामोडींची राष्ट्रवादीच्या नेतृत्वानीही दखल घेत धस यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई केल्यानंतर ते आता वेगळा मार्ग धरणार हे आता लपून राहिलेले नाही. पक्षाने कारवाई करताच तालुक्‍यातील बहुतांश धस समर्थकांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत पुढील वाटचाल अण्णांसोबतच असल्याचे स्पष्ट केले. या घडामोडींनंतर धस यांनी सोळंके, पंडितांपेक्षा धनंजय मुंडे यांच्यावर आपला रोष व्यक्त केला होता.

दरम्यान, योगायोगानेच म्हणा मंगळवारी (ता. १८) धनंजय मुंडे हे आपल्या एका न्यायलयीन प्रकरणाच्या तारखेसाठी अचानक पाटोदा येथे आले व त्यांनी काही जुन्या धस समर्थकांच्या भेटीगाठी घेतल्या त्यातच मुख्य म्हणजे एकेकाळचे धस यांचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद सभापती महेंद्र गर्जे यांच्या कार्यालयात धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आल्याने सर्वत्र वेगळ्याच चर्चेला उधाण आले असून, महेंद्र गर्जे हे बहुधा राष्ट्रवादीतच राहतील असे सध्यातरी चित्र असून सर्व काही आलबेल नसल्याचे यावरून स्पष्ट आहे. तर धनंजय मुंडे यांनी थेट पाटोदासारख्या धस यांच्या गडालाच यातून सुरुंग लावण्याचा प्रयत्नही सुरू केल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धस यांच्या राजकीय खेळीने जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघालेले आहे. मतदारसंघातील तीनही तालुक्‍यांमध्ये धस यांच्या समर्थकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, पाटोदा तालुक्‍यात धस यांचे पहिल्यापासूनच एकहाती वर्चस्व राहिलेले आहे; मात्र पक्ष निलंबनाच्या कारवाईनंतर धस यांच्यासोबत त्यांचे सगळेच समर्थक असतील असे चित्र सध्यातरी दिसत नाही. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पारगाव गटातील पराभवाला धस यांचीच फूस असल्याचे महेंद्र गर्जे यांच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. तशा प्रकारच्या पोस्ट त्यांच्याकडून सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात येत होत्या.

दरम्यान, पराभवानंतर महेंद्र गर्जे यांची शांतता बरेच काही सांगून जात होती. माजी मंत्री धस यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केल्यानंतर महेंद्र गर्जे यांचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पाटोदा येथे आले असता, त्यांनी महेंद्र गर्जे यांच्या कार्यालयात बऱ्याच जुन्या धस समर्थकांची भेट घेतली या वेळी महेंद्र गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहतील अशी चर्चा आता रंगत आहे. धस यांच्या निलंबनाने तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस सलाईनवर आली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा तालुक्‍यात महेंद्र गर्जे यांच्या हातात येऊ शकते. सुरेश धस यांच्या राजकीय खेळींमुळे आपण दुर्लक्षित राहिलो असल्याची भावना मनात ठेवून तालुक्‍याच्या राजकीय पटलावर मागे पडलेल्या राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांचे राजकीय पुनर्वसन आता धनंजय मुंडे कसे करतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.

Web Title: Surdh das kingmaker beed distic