सुरेश धस पुन्हा भाजपच्या वाटेवर?

अनिरुद्ध धर्माधिकारी
बुधवार, 22 मार्च 2017

आष्टी - बीड जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यात प्रमुख भूमिका बजावलेले माजी मंत्री सुरेश धस हे आगामी काळात भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता असून, जिल्हा परिषदेतील घडामोडीनंतर आष्टी तालुक्‍यासह मतदारसंघात हा चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे.

आष्टी - बीड जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यात प्रमुख भूमिका बजावलेले माजी मंत्री सुरेश धस हे आगामी काळात भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता असून, जिल्हा परिषदेतील घडामोडीनंतर आष्टी तालुक्‍यासह मतदारसंघात हा चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे.

मागील आठवड्यात झालेल्या पंचायत समिती निवडणुकीवेळीच धस हे जिल्हा परिषदेत भाजपला साथ देणार असल्याचे स्पष्ट झाले होते. भाजप-राष्ट्रवादीचे समान संख्याबळ असूनही मतदानावेळी भाजपच्या एका सदस्याने तटस्थ राहून राष्ट्रवादीचा सभापतिपदाचा मार्ग मोकळा केला.  पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरूनच हे घडल्याचे सांगितले गेले अन्‌ त्यावेळीच धस जिल्ह्यात राजकीय भूकंप करणार, याचा अंदाज सर्वांना आला होता.

अपेक्षेप्रमाणे मंगळवारी (ता. २१) झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीला जोरदार धक्का देत धस यांनी पक्षाचा हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. त्यामुळे धस यांच्या या निर्णयातून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. 

पाच वर्षांपूर्वीपर्यंत धस हे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील प्रमुख कारभारी होते; परंतु धनंजय मुंडे यांच्या प्रवेशानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांना झुकते माप दिल्याचे कार्यकर्त्यांतून बोलले जाते. लोकसभा निवडणूक व जिल्हा परिषदेतही पक्षातील इतर प्रमुख नेत्यांकडून धस यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांनी त्यांची अस्वस्थता मंगळवारी व्यक्त केली. 

या घडामोडीनंतर यापुढे राष्ट्रवादीत धस यांची वाट बिकट राहणार असल्याने ते भाजपचाच पर्याय स्वीकारतील, अशी शक्‍यता अधिक आहे.जिल्हा परिषदेतील घडामोडींपूर्वी पालकमंत्री मुंडे यांच्या पुढाकारातून सुरेश धस यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळीही यादृष्टीने चर्चा झाली असल्याचे कळते. त्यामुळे आगामी काळात धस पुन्हा भाजपला आपलेसे करतील, अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.

मंत्री शिंदेंचाही पुढाकार?
आष्टी मतदारसंघाला लागून असलेल्या शेजारील कर्जत-जामखेड (जि. अहमदनगर) मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढवून धस यांनी या मतदारसंघाचे आमदार व राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांना आव्हान दिले. जामखेडमधूनही धस इच्छुक असल्याची चर्चा झाली होती. या पार्श्‍वभूमीवर आपला मार्ग सुकर करण्यासाठी मंत्री शिंदे हेही धस यांना भाजपमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगितले जात आहे.

अंतर्गत कुरघोड्यांनी मोहरा दुरावला..
बीड जिल्हा परिषदेत सत्तांतर करून खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची जिल्ह्यात वाढ करणारे सुरेश धस यांनाच जिल्ह्यातील नेत्यांच्या कुरघोड्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे पक्षातील नेत्यांच्या या लाथाळ्यांमधून राष्ट्रवादीने एक हुकमी मोहरा दुरावला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Web Title: suresh das bjp