सुरेश धस यांची "राष्ट्रवादी'तून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

'झेडपी'तील पक्षविरोधी भूमिका भोवली, आष्टीतील समर्थकांचे राजीनामे

'झेडपी'तील पक्षविरोधी भूमिका भोवली, आष्टीतील समर्थकांचे राजीनामे
बीड - येथील जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवेळी पक्षविरोधी घेतलेली भूमिका माजी मंत्री सुरेश धस यांना भोवली आहे. त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाने शुक्रवारी (ता. सात) हा निर्णय घेत, त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. या निर्णयामुळे आष्टी मतदारसंघातील धस यांच्या अनेक समर्थकांनी पक्षाचे राजीनामे दिले.

जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 25, एक अपक्ष असे 26 सदस्य विजयी झाले. यामध्ये धस यांचे पाच समर्थक होते. सत्ता स्थापनेवेळी धस यांनी उघडपणे भाजपला मदत केली. याची कल्पना त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाही दिली होती.

त्यांच्या या भूमिकेमुळे सत्ता स्थापनेची राष्ट्रवादीची संधी हुकली आणि भाजपचा मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे मर्जीविरोधात पक्षाने स्थानिक काकू-नाना आघाडीला सोबत घेतल्याने नाराज झालेले आमदार जयदत्त क्षीरसागरांचेही समर्थक सदस्य जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी गैरहजर राहिले. परिणामी अध्यक्ष - उपाध्यक्षांसह सभापती निवडीत राष्ट्रवादी आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला.

दरम्यान, पत्नीची अध्यक्षपदाची संधी हुकल्याने नाराज झालेले प्रकाश सोळंके यांनी सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर, अक्षय मुंदडा यांची पक्षातून हाकालपट्टी करण्याची मागणी केली. तसे न झाल्यास पक्ष सोडण्याचा इशाराही दिला होता. दुसरीकडे धनंजय मुंडे यांनीही "गद्दार' अशी टीका केल्यानंतर सुरेध धस यांनी काकांना (दिवंगत गोपीनाथ मुंडे) धोका देणाऱ्यांनी शिकवू नये, असा पलटवार केला होता. दरम्यान, चार दिवसांपूर्वी पक्षाने यातील जयदत्त क्षीरसागरांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली; तर आज धस यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. धस यांच्यावर निलंबनाची कारवाई होताच त्यांच्या समर्थकांनी राजीनामासत्र सुरू केले.

काहींना खूश करण्यासाठी कारवाई - धस
ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार, अजित पवार यांच्याबद्दल पूर्वीपासून आदर असून, तो कायम राहील. केवळ बीडमध्येच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले. इतर ठिकाणचे नेते प्रस्थापित असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नाही. आपण सामान्य घरातला असल्याने माझ्यावर कारवाई झाली. पक्षात मागच्या दारावाटे येणाऱ्यांची चलती आहे. धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित अशा सोन्याचे चमचे तोंडात घेऊन आलेल्यांना खूश करण्यासाठी माझ्यावर कारवाई झाली. माझे म्हणणेही ऐकून घेतले नाही, असे धस म्हणाले. काहींना अडीच वर्षांनी मुख्यमंत्री होण्याचे दिवसा स्वप्न पडत असल्याची कोपरखळीही त्यांनी धनंजय मुंडेंना मारली.

Web Title: suresh dhas suspned in ncp