रांजणीत ग्रामस्थांचे घरोघरी सर्वेक्षण 

रांजणी (ता. घनसावंगी) : सर्वेक्षण करण्यासाठी उपस्थित कर्मचारी.
रांजणी (ता. घनसावंगी) : सर्वेक्षण करण्यासाठी उपस्थित कर्मचारी.

घनसावंगी (जि.जालना)-  जालना येथील कोरोना बाधित महिलेची शिक्षिका मुलगी रांजणीत काही पालक व विद्यार्थ्यांच्या संपर्कात आली होती. त्यामुळे रांजणी येथे जवळपास दीड हजार ग्रामस्थांचे होम क्वारंटाईन करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने या ग्रामस्थांचे घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

जालना शहरातील कोरोना बाधित रुग्ण महिलेच्या घरातील मुलगी रांजणी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. ती रांजणी येथील एका शाळेत काही जणांच्या संपर्कात आल्यानंतर रांजणी परिसरात खळबळ उडाली. यामुळे सोमवारी (ता.सहा) प्रशासकीय यंत्रणेकडून गावांच्या सीमा सील करून जवळपास या शिक्षिकेच्या संपर्कात आलेल्या २३१ पालक व विद्यार्थी यांच्या कुटुंबीयातील अंदाजे दीड हजार नागरिक होम क्वारंटाईन निश्‍चित केले. घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यांना अत्यावश्‍यक सुविधा घरपोच पुरविण्यात येणार आहे.

तसेच त्या शिक्षिकेच्या जालना ते रांजणी या प्रवासादरम्यान संपर्कात आलेले शिक्षक व चालक यांनाही क्वारंटाईन घोषित करण्यात आले आहे. ते सामान्य रूग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी स्वत: हून पुढे आले आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता.सात) तहसीलदार गौरव खैरनार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवार तळ ठोकून होते. ग्रामस्थांचे सर्वेक्षण करण्यासाठी २८ पथके स्थापन केली या प्रत्येक पथकात अंगणवाडीसेविका, शिक्षक, आशा वर्कस यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी जवळपास १११९ कुटूंबात घरोघरी जाऊन ग्रामस्थांची तपासणी केली. सर्दी, ताप, खोकला या प्रकाराचे लक्षणे असणाऱ्या रूग्णांची खात्री करण्यात आली. 

कर्मचाऱ्यांना नाहीत सुविधा 

ग्रामस्थांचे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. मास्क, हॅंडग्लोज, सॅनिटायझर आदी साधने देण्याची गरज होती. या कर्मचाऱ्यांनी स्वतःकडील मास्क, रुमाल आदींचा वापर करीत सर्वेक्षण केले. आता संपूर्ण १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आवश्‍यक त्या सुविधा देण्याची मागणी होत आहे. 

सर्वेक्षण करणाऱ्यांवर हल्ला 

रांजणीतील एका भागात सर्वेक्षण करणाऱ्या पथकावर काही लोकांनी हल्ला केला. यात विजय जाधव, संतोष भिसे व दत्ता धुमाळ हे शिक्षक जखमी झाले. त्यातील एकाचा मोबाईलफोनही लोकांनी फोडला. दरम्यान घनसावंगीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक मनोहर खिळदकर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जमावाला शांतता ठेवण्याच्या सूचना दिल्या. येथील खालेक कुरेशी यांनी जमावाला शांत करून सर्वेक्षण करून देण्याची विनंती केली. नंतर सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान हे सर्वेक्षण पोलिस बंदोबस्तात करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. 

रांजणी येथे ग्रामस्थांचे सर्वेक्षण करण्यासाठी २८ पथके स्थापन केली असून प्रत्येक पथकात तीन जणांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकात अंगणवाडी सेविका, शिक्षक, आशावर्कर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नियमित १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आवश्‍यक साधनांची जिल्हास्तरावर मागणी केली आहे. 
- गौरव खैरनार, 
तहसीलदार घनसावंगी 

रांजणी येथे सर्वेक्षणबाबत काही ग्रामस्थांना कल्पना नसल्यावे गैरसमजुतीतून प्रकार घडला. त्यांनी हे सर्वेक्षण करण्यास नकार दिला होता. परंतु पोलिस व प्रशासनाच्या वतीने समजाविण्यात आल्यानंतर सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यापुढे सर्वेक्षण करतांना पोलिस काळजी घेणार आहेत. 
- शिवाजी बंटेवार, 
पोलिस निरीक्षक घनसावंगी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com