वडील सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, इंग्लंडमध्ये शिक्षण पण गावाच्या विकासासाठी तरुण बनला ग्रामपंचायत सदस्य

Sushantsinh Pawar News
Sushantsinh Pawar News

परळी वैजनाथ (जि.बीड) : ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील गडदेवाडी येथे सुशांतसिंह पवार (वय ३०) या युवकाने सातपैकी चार जागा जिंकत गावची ग्रामपंचायत ताब्यात घेतली. इंग्लंडमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याचा ध्यास घेत सुशांतसिंहने ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यांचे वडील हे सेवानिवृत्त आय.ए.एस.अधिकारी आहेत. आजकाल युवकवर्ग राजकारणापासून दुरावला आहे. मात्र आजच्या काळात राजकारण व समाजकारण यांचा समतोल साधला तरच विकासाचा मार्ग मिळतो.

हाच ध्यास मनात ठेवत अनेक ग्रामपंचायती युवकांच्या ताब्यात गेल्या. जिल्ह्यातील गडदेवाडी (ता.परळी) या ठिकाणी हेच चित्र पाहायला मिळाले. इंग्लंडमधील नॉटिंगहॅम येथे चार वर्ष इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या सुशांतसिंह पवार याने गडदेवाडीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवली. निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली. गावातील जनतेने परिवर्तनाचा चंग बांधल्याने फक्त एक मताच्या फरकाने सुशांतसिंह पवार विजयी झाला. वडील बळीराम पवार हे आय.ए.एस. अधिकारी असून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे.

मोठे कुटुंब असताना केवळ आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी सुशांतसिंह याने गावात येऊन पॅनल उभे केले. सातपैकी चार सदस्य निवडून आले. गावाचा सर्वांगीण विकास करून जन्मभूमीचे ऋण फेडणार असल्याचे सुशांतने सांगितले. इंग्लंडमधून तो चार महिन्यांपूर्वीच मायदेशी परतला आहे. येथे शिक्षण घेतल्यानंतर तो नोकरी करीत होता. केवळ जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी तो गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तो मायदेशी परतला आहे.


आरोग्य उपकेंद्रासाठी स्वमालकीची जागा देणार

मी सगळीकडे फिरलो परंतु माझे गाव आजही विकासापासून दूर आहे. ऊसतोड कामगारांची संख्या जास्त आहे. गावात आरोग्य उपकेंद्र मंजूर आहे. परंतु जागेअभावी ते बांधले गेले नाही. मी आता स्वत:च्या मालकीची जागा आरोग्य उपकेंद्रासाठी देणार आहे. लहान मुलांची अंगणवाडी गावाच्या बाहेर बांधली गेली आहे. तिचे स्थलांतर गावात करणार आहोत. २०२४ पर्यंत सर्वांना घर देण्याचा पंतप्रधानांचा संकल्प आहे. त्याची मी अंमलबजावणी करणार. वृध्द लोकांना पेन्शन मिळवून देणार. मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी मी मुंबईतला मोठा व्यवसाय असतानाही गावाकडे आलो आहे असे सुशांतसिंह यांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com