पदाचा गैरवापर करणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांना निलंबित करा : भाजयुमो

नवनाथ इधाटे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

फुलंब्री येथील मंडळ अधिकारी कदम व जैस्वाल यांच्या तक्रारीचे निवेदन आलेले आहे. या प्रकरणाची सर्व बाजूने सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर योग्य ती कडक कार्यवाई करण्यात येईल.

- संगीता चव्हाण, तहसीलदार फुलंब्री

फुलंब्री : फुलंब्री तहसील कार्यालयांअंतर्गत कार्यरत असलेले मंडळ अधिकारी पंडित कदम व शंकर जैस्वाल हे पदाचा गैरवापर करून आर्थिक देवाणघेवाण करून फेरफार मंजूर करतात. शेतकऱ्यांना वेढीस धरण्याचा प्रयत्न मंडळ अधिकाऱ्यांकडून केला जात असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करावे. अन्यथा भाजप युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजयुमोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

तसेच या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना फॅक्सद्वारे तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देण्यात आल्या. सदरील निवेदनात म्हटले आहे, की फुलंब्री येथे कार्यरत असलेले मंडळ अधिकारी पंडित कदम व शंकर जैस्वाल हे दोघे ही शेतकरी व इतर मालमत्ताधारकास विनाकारण तांत्रिक अडचणी पुढे करून दोन - तीन महिन्यांपासून फेरफार मंजूर करत नाही. दोघेही मंडळ अधिकारी ज्याने पैसे दिले, त्यांचेच फेरफार मंजूर करतात.

तसेच फुलंब्री येथील मंडळ अधिकारी कदम यांच्याकडे फुलंब्री मंडळ अधिकारी पदाचा कार्यभार नसताना सुद्धा त्याने फुलंब्री येथील भरपूर फेरफार हे आर्थिक देवाण-घेवाण करून फेरफारास मंजुरी दिलेल्या आहे. फेरफार मंजूर करतांना सिरीयल प्रमाणे न करता आर्थिक देवाणघेवाण झालेलेच प्रकरण मंजूर केलेले आहे. त्यापूर्वीचे 100 ते 115 फेरफार हे प्रलंबित असून त्यांनी काहीही विचार न करता काही मोजकेच फेरफार अधिकार नसताना सुद्धा आर्थिक देवाण घेवाण करून मंजूर करून दिले. 23 ऑगस्टला फुलंब्रीच्या तहसीलदार संगिता चव्हाण यांना मंडल अधिकारी पंडित कदम यांच्याविषयी माहिती दिल्यानंतर तहसीलदारांनी सांगितले, की मागील 15 ते 20 दिवसापूर्वीच पंडित कदम यांच्याकडून फुलंब्री हे मंडळ काढून घेतलेले आहे.

परंतु प्रत्यक्षात त्यांनी पदाचा गैरवापर करून फुलंब्रीचा पदभार नसतानाही त्यानी दोन दिवसांपूर्वी 21 ऑगस्ट रोजी फेरफार करून दिलेले आहे. याचा पुरावा असलेले कागदपत्रेही सोबत जोडण्यात आली आहेत. फुलंब्री मंडळ अधिकारी पदाचा गैरवापर करून आर्थिक आकसापोटी कार्यभार नसताना फेरफार करणारे मंडळ अधिकारी पंडित कदम यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अन्यथा भाजप युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

फुलंब्री शहर परिसरात शेतजमीन किंवा प्लॉट खरेदी केल्यानंतर संबधित शेतकरी जर मंडळ अधिकाऱ्यांना भेटून आर्थिक देवाणघेवाण केली नाही. तर त्यांचा फेरफार मंजूर होत नाही. तसेच फुलंब्री मंडळाचा अधिकार कदम यांच्याकडे नसतानाही फेरफार मंजूर केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. त्यामुळे संबंधित मंडळ अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अन्यथा भाजयु मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

- योगेश मिसाळ, शहराध्यक्ष, भाजयु मोर्चा फुलंब्री
 

Web Title: Suspend officers who is Misuse of Post