'स्वाभिमानी'च्या वतीने लातुरात धरणे सुरु

हरी तुगावकर
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली तूर आणि हरभरा शासनाने हमी भावाने खरेदी
केला होता. त्यावेळी सात दिवसात पैसे देण्याची घोषणा शासनाने केली होती.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पणन महामंडळाकडे आपला माल दिला.

लातूर : शेतकऱ्यांचा माल हमी भावात खरेदी केल्यानंतर 7 दिवसाच्या
आत पैसे देण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु चार महिने उलटूनही
अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. याचा निषेध करीत शेतकऱयांना
तातडीने पैसे मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार पासून (ता. 6) येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली तूर आणि हरभरा शासनाने हमी भावाने खरेदी
केला होता. त्यावेळी सात दिवसात पैसे देण्याची घोषणा शासनाने केली होती.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पणन महामंडळाकडे आपला माल दिला. त्याला आता चार महिने होत आहेत. पण अजुनही पैसे मिळत नाहीत. आजही जिल्ह्यातील 5 हजार 500 शेतकऱ्यांचे 50 कोटी रुपये शासनाने देणे बाकी आहे. यात तूर उत्पादक एक हजार 500 तर हरभरा उत्पादित केलेल्या चार हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

शासनाकडे माल देवून अद्यापही पैसे मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पेरणीनंतर आता मशागत आणि मजुरांना देण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पैसे द्यावेत या मागणीसाठी लातूर बाजार समिती परिसरात पणन महामंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, विजय जाधव, अरुण कुलकर्णी, धर्मराज पाटील, सचिन ढवण, गणेश माडजे, बबन चव्हाण, दत्तू टिपे, नवनाथ शिंदे आदीं सहभागी झाले आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Swabhimanis Dharne Agitation On At Latur