स्वरप्रभू बाबूजींचे जीवनकार्य मोठ्या पडद्यावर

सुशांत सांगवे
रविवार, 22 जुलै 2018

"तुझे गीत गाण्यासाठी', "आकाशी झेप घे रे', "सखी मंद झाल्या तारका' अशी कितीतरी भावगीते, भक्तिगीते अन्‌ गीत रामायण आदींतून मराठी संगीत क्षेत्रात मानाचा मुजरा मिळविणारे स्वरयात्री, संवेदनक्षम कलाकार अशी ओळख निर्माण केलेले ख्यातनाम गायक-संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांचे सुरेल जीवनकार्य मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यातून भावी पिढ्यांना या युगनिर्मात्याचे जीवन अनुभवायला मिळणार आहे. 

लातूर - "तुझे गीत गाण्यासाठी', "आकाशी झेप घे रे', "सखी मंद झाल्या तारका' अशी कितीतरी भावगीते, भक्तिगीते अन्‌ गीत रामायण आदींतून मराठी संगीत क्षेत्रात मानाचा मुजरा मिळविणारे स्वरयात्री, संवेदनक्षम कलाकार अशी ओळख निर्माण केलेले ख्यातनाम गायक-संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांचे सुरेल जीवनकार्य मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यातून भावी पिढ्यांना या युगनिर्मात्याचे जीवन अनुभवायला मिळणार आहे. 

साहित्यिक पु. ल. देशपांडे, गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्यासह संगीतकार सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष राज्य सरकार साजरे करणार आहे. त्यासाठी 25 जुलै 1918 ते 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. अशा कार्यक्रमांबरोबरच बाबूजींच्या जीवनावर चित्रपट तयार करण्यासाठी गोल्डन रिव्हर संस्थेने पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाच्या पटकथेचे लेखनही सध्या सुरू आहे. बाबूजींचे पुत्र व प्रसिद्ध गायक श्रीधर फडके सध्या लातूरमध्ये आले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी बाबूजींच्या जीवनावर तयार होणाऱ्या चित्रपटाची माहिती दिली. ते म्हणाले की, हा चित्रपट बाबूजींच्या "जगाच्या पाठीवर' या आत्मचरित्राला केंद्रस्थानी ठेवून तयार होणार आहे. चित्रपटाची पटकथा किरण यज्ञोपवित लिहित आहेत. हा चित्रपट वर्षभरात प्रदर्शित व्हावा, अशी आमच्या इच्छा आहे. 

"गीत रामायण'चे स्थान कायम 
प्रभू राम हे आपल्या मनात, हदयात आहेत. त्यामुळे त्यांच्या चरित्राचे गायन कोणाला आवडणार नाही? त्यात गदिमांचे अप्रतिम शब्द आणि त्याच पद्धतीचे बाबूजींचे संगीत अन त्यांचाच स्वर त्यामुळे "गीत रामायण' हा अद्‌भुत कलाविष्कार तयार झाला. गदिमांचे जसे सहज-सुंदर शब्द आहेत अगदी तसेच बाबूंजीचे संगीत आहे. त्यामुळे ते 63 वर्षांनंतरही लोकांच्या मनांत गीत रामायणाचे स्थान कायम आहे, अशी भावना श्रीधर फडके यांनी व्यक्त केली.

Web Title: Swarooprabhu Babuji on a big screen