दिव्यांगांचे "स्वावलंबन' लालफितीत 

योगेश पायघन
सोमवार, 3 डिसेंबर 2018

औरंगाबाद : दिव्यांगांना 21 प्रकारच्या दिव्यांगत्वाचे "स्वावलंबन कार्ड' ऑनलाइन देण्याच्या शासन आदेशाला सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षणसह महापालिकेच्या आरोग्य विभागाने केराची टोपली दाखवली आहे. 19 सप्टेंबरला निघालेल्या "जीआर'ला अडीच महिने उलटूनही दिव्यांगांचे "स्वावलंबन' लालफितीत अडकल्याचे चित्र आहे. 

औरंगाबाद : दिव्यांगांना 21 प्रकारच्या दिव्यांगत्वाचे "स्वावलंबन कार्ड' ऑनलाइन देण्याच्या शासन आदेशाला सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षणसह महापालिकेच्या आरोग्य विभागाने केराची टोपली दाखवली आहे. 19 सप्टेंबरला निघालेल्या "जीआर'ला अडीच महिने उलटूनही दिव्यांगांचे "स्वावलंबन' लालफितीत अडकल्याचे चित्र आहे. 

दिव्यांगांना वैश्‍विक ओळखपत्र, स्वावलंबन कार्ड देऊन विविध योजनांतून त्यांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र या योजनांसाठी पात्र होण्यासाठी लागणाऱ्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठीच अपंगांना दिव्यातून सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी झालेल्या अपंगांची संख्या नऊ हजार 332 असून, त्याहून अधिक संख्या शहरी भागात आहे. ही आतापर्यंत मान्य सहा प्रकारच्या अपंगत्वाची संख्या होती; मात्र आता 21 प्रकारचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळणार असल्याने ही आकडेवारी जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत दहा टक्के असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिव्यांग प्रमाणपत्र ही अपंगांच्या योजनांसाठी प्राथमिक अर्हता आहे. तेच मिळाले नाही; तर या अपंगांना शासकीय लाभ कसा मिळणार? असा सवालही अपंगांकडून उपस्थित केला जात आहे. 

ग्रामपंचायतीत दिव्यांग नोंदणी 
तालुके ः संख्या 
वैजापूर ः 1,802 
गंगापूर ः 1,217 
औरंगाबाद ः 1,207 
कन्नड ः 1,130 
सिल्लोड ः 1,058 
फुलंब्री ः 1,039 
पैठण ः 822 
सोयगाव ः 687 
खुलताबाद ः 370 
एकूण ः 9,332 

या प्रकारांचा झाला समावेश 
दृष्टिदोष (अंधत्व), कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुदिव्यांगता, शारीरिक वाढ खुंटणे, स्वमग्नता, मेंदूचा पक्षाघात, स्नायूंची विकृती, मज्जासंस्थेचे आजार, अध्ययन अक्षमता, मल्टिपल स्क्‍लेरॉसिस, वाचा व भाषा दोष, थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल, ऍसिड ऍटॅक व्हिक्‍टीम, पार्किन्सन्स डिसीज, दृष्टिक्षीणता, कृष्ठरोग या 21 प्रकारचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र ऑनलाइन मिळणार आहे. 

138 लोकांना प्रशिक्षण 
स्वावलंबन कार्ड वेबसाईटमधून दिव्यांग ऍसेसमेंट व प्रमाणपत्रासंदर्भात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील 138 तज्ज्ञ व ऑपरेटर्सना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती सिडको येथील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली. 

जिल्ह्यात चारच केंद्र 
वैजापूर, सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय व चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पॅनेल तयार झाले. त्यांच्या सह्याही अपलोड झाल्या. लवकरच स्वावलंबन कार्ड अंतर्गत प्रमाणपत्र देण्यात येतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले. परिमंडळातही लवकच ही सेवा दिव्यांगांना दिली जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले. घाटी रुग्णालयात पॅनेल व सह्यांचे अपलोडिंगचे काम पूर्ण झाले असून, प्रातिनिधिक प्रमाणपत्राची चाचणीही झाली.

Web Title: swavlamban card still not distributed to handicapped