स्वाइन फ्लूचा वाढला धोका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

अशी आहेत लक्षणे

  • तीव्र ताप
  • कोरडा खोकला
  • नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे
  • घशामध्ये खवखव होणे, थकवा येणे
  • काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी होणे

लातूर - सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण, अधून-मधून पावसाची सर... या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला अशा आजारांबरोबरच शहरात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. गेल्या काही दिवसांत स्वाइन फ्लूसदृश रुग्णांची संख्या वाढली असल्याने शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.

पावसाळा संपत आला तरी लातुरात अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. पण अधूनमधून पावसाची सर येत आहे. त्यातच उन्हाळ्यात जाणवावी अशी उष्णता तर कधी थंड वारे लातूरकरांना अनुभवायला मिळत आहे. 

एकाच दिवशी थंडी, पाऊस आणि उष्णता सहन करावी लागत असल्याने शहरात साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. त्यातच स्वाइन फ्लूचाही धोका वाढला आहे. या आजाराची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांत चांगलीच वाढ झाली आहे. श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. रमेश भराटे म्हणाले, की पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. आपल्याकडेही सातत्याने वातावरणात बदल होत आहेत.

त्यामुळे हा आजार डोके वर काढू शकतो. सध्या या आजाराची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात येत आहेत. हा आजार झाला म्हणून घाबरून जाऊ नये. या आजारावर ओसेलॅटमिवीर (टॅमीफ्लू) नावाचे औषध वेगवेगळ्या दवाखान्यांत उपलब्ध आहे.

गंभीर, गुंतागुंतीच्या आजारांमध्ये रुग्ण दवाखान्यात दाखल असल्यास एच-१ एन-१ आणि आरटीपीसीआर नावाची घशातील द्रवाची तपासणी करून स्वाइन फ्लूचे निदान करता येते. वेळेत निदान आणि उपचार केल्याने यातून पूर्णपणे बरे होता येते.

काही शहरांत स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असला तरी योग्य काळजी आणि वेळेत उपचार घेतल्याने यातून नक्कीच बरे होता येते. फ्लूची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या आजाराचे निदान व उपचार डॉक्‍टरांकडून त्वरित सुरू होणे रुग्णांच्या दृष्टीने हिताचे असते.
- डॉ. रमेश भराटे, श्वसन विकारतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swine Danger Increase in Latur Healthcare