स्वाईन फ्लू रुग्णालाही वेटिंग!

Swine-Flu-Patient
Swine-Flu-Patient

औरंगाबाद - घाटीत स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण दाखल झाले आहेत. तर गंगापूर तालुक्‍यातील प्रसूती होऊन १३ दिवस झालेली महिला (वय २२) खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे उपचार घेत आहे. घाटीत बुलडाण्याचा एक रुग्ण असून दुसरा हर्सूल परिसरातील आहे. शहरात स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचा दावा केला जात होता. मात्र, पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊनच रुग्ण दाखल झाल्याने आतातरी महापालिकेचा आरोग्य विभाग जागा होईल का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

हर्सूल भागातील एका पन्नास वर्षीय रुग्णाला दोन दिवसांपूर्वी स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान खासगी रुग्णालयात झाले. तेथील खर्च परवडत नसल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात (घाटी) व जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (ता. २७) विचारणा केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने दुपारी त्यांनी घाटीत धाव घेतली. या रुग्णासाठी उपमहापौरांनीही घाटीत शिफारस केली होती.

दिरंगाईचा फटका
घाटीत स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे सांगितल्यावर कोणीच हात लावायला तयार नव्हते. तब्बल तास-दीड तास हा रुग्ण तसाच अपघात विभागात पडून होता. वेटिंग करीत अखेर उपचार मिळाल्याचे रुग्णाच्या नातेवाइकाने ‘सकाळ’ला सांगितले. 

जिल्हा रुग्णालयात साथरोगाला उडवाउडवीची उत्तरे
कॅज्युअल्टीत स्वाईन फ्लू रुग्णाला कोणी हात लावेना 
खासगी रुग्णवाहिकेने हलवले स्वतंत्र स्वाईन फ्लू वॉर्डात 
मेडिसीन इमारतीत स्ट्रेचरची वीस मिनिटे शोधाशोध
वॉर्ड शोधायला पंधरा मिनिटांची भटकंती
दीड तासानंतर मिळाले उपचार 
घाटीत दोघांवर, तर खासगीत एक रुग्ण 
महापालिकेचा आरोग्य विभाग अनभिज्ञ

स्वतंत्र वॉर्डासाठी टोलवाटोलवी
घाटीत स्वाईन फ्लू दोन व डेंगीच्या सहा रुग्णांसह ताप व न्यूमोनियाचे रुग्ण वाढल्याने मेडिसीन विभागप्रमुख व वैद्यकीय अधीक्षकांनी महापौरांची १४ सप्टेंबरला भेट घेतली होती. त्यावेळी पुढच्या तीन दिवसांत स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, घाटीने हा वॉर्ड सुरू करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे टोलवाटोलवी केल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी हा स्वतंत्र वार्ड सुरू झाला. मेडिसीनचा संसर्गजन्य वॉर्ड क्र. सहा हा महिला वॉर्ड करण्यात आल्याने सुविधा झाली. मात्र, संसर्गजन्य रुग्णांची व्यवस्थाच नसल्याने हे रुग्ण जनरल वॉर्डमध्ये उपचार घेतात. १४ सप्टेंबरला डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. भारत सोनवणे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली होती. त्यात १७ सप्टेंबरला स्वाईन फ्लू वॉर्ड सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, हे काम जिल्हा सामान्य रुग्णालय करेल, तिथे वॉर्ड सुरू करू, अशा टोलवाटोलवीत दहा दिवस गेले. अखेर गुरुवारी (ता. २७) हा वॉर्ड तातडीने घाटीला सुरू करावा लागला. वार्ड सुरू करताच दोन रुग्ण दाखल झाले. या वॉर्डसाठी पाच व्हेंटिलेटर मिनी घाटीतून उसनवारीवर आणले, तर चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती डॉ. भारत सोनवणे यांनी दिली. 

आमची फक्त सहकार्याची भूमिका
मिनी घाटीत वॉर्ड सुरू करण्याचा घाटी प्रशासनाचा विचार होता. त्याला आमची सहकार्याची भूमिका होती. गुरुवारी त्यांनी व्हेंटिलेटर मागितले, आम्ही दिले. यात मिनी घाटीचा काहीही संबंध नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी ‘सकाळ’ला सांगितले. रुग्णांची कोणतीही दैना झाली नसल्याचे डॉ. सोनवणे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com