माझ्याशी का बोलत नाही असे म्हणत अल्पवयीन मुलीवर तलवारीने वार, बीड तालुक्यातील धक्कादायक घटना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

माझ्याशी का बोलत नाही असे म्हणत एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर तलवारीने वार हल्ला करण्यात आला.

बीड : माझ्याशी का बोलत नाही असे म्हणत एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर तलवारीने वार हल्ला करण्यात आला. ही घटना बुधवारी (ता. ३० डिसेंबर) रामनगर (ता. बीड) येथे घडली असून पिडीतेवर बीड मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोपट बोबडे (वय, रा. महालक्ष्मी चौक, रामनगर) याची एका १७ वर्षीय पिडीतेशी वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. तो तिच्याशी फोनवर बोलत होता. एप्रिल २०२० मध्ये अचानक पोपट बोबडे हा पिडीतेच्या घरी गेल्याने कुटुंबातील व्यक्तींनी तिला जाब विचारला.

 

 

यामुळे तीने बोबडेला तु घरी का आलास म्हणत पुढे बोलणे बंद केले. यानंतर कुटुंबीयांनी पिडीतेला बीड येथे आणून ठेवले. ३० डिसेंबरला सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आई वडील घराबाहेर गेले असता पीडिता कामानिमित्त अंगणात आली होती. यावेळी पोपट बोबडे हा पाठीमागून अचानक आला अन माझ्याशी का बोलत नाहीस असे म्हणत त्याने पिडीतेवर तलवारीने वार केले. यात जखमी मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून आरोपी विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे करीत आहेत.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sword Attack On Minor Girl Through One Sided Love Beed News