जपूया काळ्या आईचे आरोग्य 

सुषेन जाधव
बुधवार, 5 डिसेंबर 2018

औरंगाबाद : जमिनीतील प्लॅस्टिकचा वेळीच बंदोबस्त न करणे किंवा ते जमिनीत जाळणे, मृदेची धूप यातून काळ्या आईचे आरोग्य बिघडले आहे. असेच सुरू राहिल्यास एक दिवस आपणास नापिकी; तसेच पाण्याच्या दूषित स्रोतांना सामोरे जावे लागणार असून, याचा परिणाम सध्या दिसून येत असल्याचे रसायन तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. गौरी कल्लावार यांनी सांगितले. 
शेतजमिनीत प्लॅस्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

याअनुषंगाने काळजी घेणे गरजेचे आहे. प्लॅस्टिक हे मातीच्या संपर्कात आल्यानंतर हवा, तापमान, सूर्यप्रकाश, जीवजंतू, रसायने यामुळे प्लॅस्टिकचे विघटन होते. प्लॅस्टिक साधारणपणे 5 "एमएम'पेक्षा लहान (मायक्रो प्लॅस्टिक) तुकड्यांत विभागते. विघटनाच्या पुढच्या टप्प्यात या तुकड्यांचे आणखी लहान कण तयार होऊन जीवसृष्टीत प्रवेश करते. परिणामी जमीन नापीक होते; तसेच जलाशयात गेलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे प्लॅस्टिकयुक्त पाणी शेतीला दिल्यास सुपीकता कमी होते. याव्यतिरिक्त जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक गेल्याने जनावरे दगावतात. 

कॅन्सरचाही धोका 
जमिनीत पडून राहिलेल्या प्लॅस्टिकमुळे तसेच ते जाळल्याने तयार होणाऱ्या डायऑक्‍झिन व बिसफिनोल ही रसायने कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर थॅलेटमुळे हार्मोन्सवर परिणाम होत असल्याचे संशोधनांती अहवालात आढळले आहे. 

प्लॅस्टिकच्या माध्यमातून थॅलेट बिसफिनॉल व डायऑक्‍झिन यांसारखी रसायने मातीला प्रदूषित करतात. प्लॅस्टिक जाळल्याने डायऑक्‍झिन निर्माण होऊन पानांवर जमा होते. त्यानंतर ते अन्नसाखळीत प्रवेश करते. यासोबत जमिनीतील आर्द्रता व ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता कमी होते; तसेच पाण्याचे स्रोतही प्रदूषित होतात. यावर उपाय म्हणून प्लॅस्टिकच्या पुनर्वापरासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 
- प्रा. गौरी कल्लावार, रसायन तंत्रज्ञान विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 

जमिनीत प्लॅस्टिक कुजत नाही. त्यामुळे जमिनीतील नैसर्गिक निचरा थांबतो. यासोबतच ऍग्रो केमिकलच्या भरमसाट वापराने जमिनीच्या पोषक जिवाणूंवर गंभीर परिणाम होतो. नागरी वस्त्यांतील कचरा कुठेही फेकून दिल्याने जमिनी नापीक होतात. 
डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Web Title: take care about Soil conservation