Independence Day - आरोग्याची काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे ः पालकमंत्री नवाब मलिक

गणेश पांडे
Saturday, 15 August 2020

कोरोनाने जगात सर्वत्र थैमान घातले असून, नागरिकांनी या संकटाचा समर्थपणे लढा देत, आपल्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे

परभणी : मागील काही कालावधीपासून कोरोनाने जगात सर्वत्र थैमान घातले असून, नागरिकांनी या संकटाचा समर्थपणे लढा देत, आपल्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी (ता. १५) केले.

भारतीय स्वातंत्र दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय आणि महापालिका आयुक्त  देविदास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकरी बांधवांना रुपये 297.00 कोटी रक्कम संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

पालकमंत्री श्री. मलिक म्हणाले, यावर्षी जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती समाधारकारक असून जिल्ह्यात 480.6 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 4 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. तसेच या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 78 हजार 882 शेतकऱ्यांना 436 कोटी 48 लाख रुपये पिक कर्जाचे वितरीत करण्यात आले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकरी बांधवांना 983 कोटी 16 लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम अदा करण्यात आली आहे. गत ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकरी बांधवांना रुपये 297.00 कोटी रक्कम संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यावर्षी खरीप हंगामासाठी या योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 3.75 लाख हेक्टरवर पिक विमा संरक्षण कवच घेतले आहे.  जिल्ह्यात दहा वर्षानंतर प्रथमच विक्रमी कापुस खरेदी करण्यात झाली असून 34 हजार 22 शेतकऱ्यांचा 10 लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याने शेतकरी बांधव समाधानी झाले असल्याचे ही श्री. मलिक यावेळी म्हणाले.

हेही वाचानांदेड : अर्धापूर येथील नगरपंचायतमधील दोघेजण लाचेच्या जाळ्यात

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे

सद्यस्थितीत सर्व देशांत कोरोनाने थैमान घातले असून जिल्ह्यात. कोरोनाच्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून याकरीता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. याकरीता खाजगी डॉक्टरांची देखील सहकार्य घेतले जात आहे.  तसेच बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात येणाऱ्या व्यक्तींची जिल्हा परिषदेच्या आरोग्‌य विभागकडून व्हीआरआरटी (Village Rapid Response Team) पथकामार्फत तपासणी करण्यात येत असल्याचे ही यावेळी म्हणाले. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची उपस्थिती होती.

रामदास आम्ले यांच्या वारसास मदतीचा धनादेश प्रदान

गंगाखेड तालूक्यातील सुपा ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांना कोवीड-19 चा संसर्ग होऊ नये याकरीता उपाययोजना करण्यासाठी कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी रामदास अनंतराव आम्ले यांचा 3 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याअनुषंगाने रामदास अनंतराव आम्ले यांच्या वारसांना 50 लाख रुपयांचा विमा कवच मदतीची रक्कम त्यांच्या वारसांना पालकमंत्री श्री. मलिक यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात देण्यात आली. तसेच यावेळी जिल्ह्यात कोविड-19 बाबत महत्वपुर्ण योगदान देणाऱ्या वैद्यकिय क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care of health and cooperate with the administration: Guardian Minister Nawab Malik parbhani news