Latur : फेरफार केल्याच्या कारणावरून तलाठ्याला मारहाण

संघटना आक्रमक होताच पोलिसांकडून व्यक्तीला अटक
marathwada
marathwadasakal

लातूर : पाखरसांगवी (ता. लातूर) सज्जाचे तलाठी सदानंद व्यंकट सागावे यांना गुरुवारी (ता. २३) सकाळी त्यांच्या कार्यालयात फेरफाराच्या कारणावरून एका व्यक्तीने जबर मारहाण केली. या घटनेनंतर मंडळ अधिकारी व तलाठी संघटना आक्रमक झाली व घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत त्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हालचाली करीत अमोल गुंडुगीर गिरी (रा. खंडापूर) याला अटक केली.

पोलिसांनी सांगितले, की तलाठी सागावे हे बजाज शोरूममागील त्यांच्या वाल्मीकीनगर कार्यालयात गुरुवारी सकाळी कामकाज करत असताना खंडापूर येथील अमोल गिरी हा तिथे आला. त्याने खंडापूर शिवारातील त्याच्या मयत वडिलांच्या जमिनीच्या फेरफाराची कागदपत्रे मागितली. वडिलांच्या नोंदणीकृत मृत्युपत्रावरून सागावे यांनी फेरफारात सुरेखा गुंडुगीर गिरी व प्रियांका गुंडुगीर गिरी यांच्या नावाची नोंद घेतली होती. त्याला अमोल गिरी याने आक्षेप घेतला. परस्पर हा फेरफार का घेतला, अशी विचारणा करत सागावे यांना मारहाण करण्यास सुरवात केली.

सागावे त्याला चुकीचा फेरफार असेल तर त्याला अपिल करून रद्द करून घ्या, असे सांगत होते. मात्र, तो ऐकत नव्हता. उपस्थित लोकांनी सागावे यांना बाजूला घेतले. त्यानंतर गिरी तेथून निघून गेला. तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश हिप्परगे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सागावे यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली.

सागावे यांना घेऊन ते एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेले. तिथे अमोल गिरी याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्यासह मारहाण व शिवीगाळ केल्याबाबत रीतसर तक्रार दिली. तेथून संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना घटनेची माहिती दिली. श्री. ढगे यांनी शहर पोलिस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत गिरी याला अटक केली. या घटनेचा संघटनेने निषेध केला असून, यापुढील काळात अशा घटना होऊ नयेत म्हणून उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन शुक्रवारी (ता. २४) जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे श्री. हिप्परगे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com