तलाठी पदाची परीक्षा अन्‌ जिल्हा प्रशासनाचे जागरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

लातूर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तलाठी पदासाठी रविवारी (ता. ११) सकाळी अकरा ते दुपारी एकदरम्यान लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका काढण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारची (ता. १०) रात्र जागून काढली. परीक्षेनंतरही उदगीर येथील गणेश विसर्जन व नांदेडला जाऊन परत आल्यानंतरच रात्री उशिरा श्री. पोले यांच्या डोळ्याला डोळा लागला.

 

लातूर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तलाठी पदासाठी रविवारी (ता. ११) सकाळी अकरा ते दुपारी एकदरम्यान लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका काढण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारची (ता. १०) रात्र जागून काढली. परीक्षेनंतरही उदगीर येथील गणेश विसर्जन व नांदेडला जाऊन परत आल्यानंतरच रात्री उशिरा श्री. पोले यांच्या डोळ्याला डोळा लागला.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील वर्ग तीन व चार पदांच्या भरती प्रक्रियेसाठी असलेल्या जिल्हा निवड समितीचे जिल्हाधिकारीच अध्यक्ष असतात. त्यांच्याच पुढाकाराने भरतीतील लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका काढण्यात येते. काही लेखी परीक्षांमध्ये राज्यात विविध ठिकाणी प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार मागील काळात घडले. यातूनच प्रश्नपत्रिकेची विशेष काळजी अधिकाऱ्यांना घ्यावी लागत आहे. यामुळे परीक्षेच्या आधी काही दिवस प्रश्नपत्रिका तयार करणेही कठीण होऊन बसले आहे. परीक्षेच्या आधी काही तास प्रश्नपत्रिका तयार करून व त्याच्या झेरॉक्‍स काढून त्या परीक्षा केंद्रावर पोच करण्याची पद्धत अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. यातूनच रविवारी झालेल्या तलाठी परीक्षेसाठी जिल्हाधिकारी श्री. पोले, निवड समितीचे सचिव व प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. प्रदीप मरवाळे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांनी शनिवारची रात्र जागून काढली. नऊ पदांसाठी झालेल्या या परीक्षेसाठी तीन हजार ८४७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. मोठ्या संख्येने उमेदवार असल्याने प्रश्नपत्रिका तयार करून झेरॉक्‍स काढण्यासाठी वेळ लागणार होता. यामुळे पोलिस बंदोबस्तात श्री. पोले व डॉ. मरवाळे यांनी मध्यरात्री साडेबारापासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्रश्नपत्रिकेची तयारी सुरू केली. 

डोळ्यांत झोप असूनही त्यांना डोळ्यांत तेल घालून प्रश्नपत्रिका काढण्याचे काम दोघांना करावे लागले. प्रश्नपत्रिका काढून त्याच्या झेरॉक्‍स प्रतीही काळजीपूर्वक तपासून उपकेंद्रप्रमुख तहसीलदारांच्या ताब्यात दिल्यानंतर प्रश्नपत्रिकेची कसरत थांबून सर्वांना उसंत मिळाली.   

 

दिवसभर पुन्हा कसरत

प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोचल्यानंतर श्री. पोले यांना उदगीर येथील गणेश विसर्जनासाठी जावे लागले. इकडे डॉ. मरवाळे यांनी परीक्षेची सर्व जबाबदारी सांभाळली. दहा केंद्रांवर झालेल्या परीक्षेला ७७५ उमेदवारांनी पाठ दाखविली तर तीन हजार ७२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. राज्यभरात एकाच वेळी तलाठी पदाच्या परीक्षा झाल्याने बहुतांश उमेदवार गैरहजर राहिल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Talathi examination office and district administration awakening