#HowdyModi : स्वयंसेवक म्हणताहेत, 'हाऊडी, मोदी' हा घरचाच कार्यक्रम!'

अतुल पाटील 
रविवार, 22 सप्टेंबर 2019

कार्यक्रमाला 50 हजार जणांनी नोंदणी केली असली तरी, त्यातही 3 हजार विशेष निमंत्रित आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पत्रिका आणि बँड आवश्‍यक केला आहे. यातील एक हजार निमंत्रितांसोबत कार्यक्रमानंतर समीट असेल.

औरंगाबाद : ''आपल्या देशाचे पंतप्रधान आमच्या शहरात येत आहेत. त्यानिमित्त अमेरिकेतील सिनेटर्स, काँग्रेसमन, स्टेट गर्व्हनर्स, कंपन्यांचे सीईओ असे तब्बल तीन हजार विशेष निमंत्रित आहेत. त्यांच्यावर आपल्या देशाचा व्यावसायिक प्रभाव पडावा. यासाठी हा आपल्या घरचाच कार्यक्रम असल्यासारखे आमचे काम सुरु आहे,'' अशी भावना तानाजी दबडे यांनी व्यक्‍त केलीय. टेक्‍सास प्रांतातील ह्युस्टन शहरात आज (ता.22) रात्री आठनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधीत करणार आहेत. 

तानाजी दबडे हे मूळचे करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील आहेत. कोल्हापुरच्या केआयटीत पदवी, ब्युमोंटमधील लामार युनिव्हर्सिटीत पदव्युत्तर पदवी घेत 2012 पासून ह्युस्टन शहरात ऑईल आणि गॅस क्षेत्रातील इन्टेकसी कंपनीत ते कार्यरत आहेत. सध्या ते 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत.

त्यांनी 'सकाळ'ला सांगितले की, ''एक महिन्यापासून तयारी सुरू आहे. विकेंडचे दोन दिवस मी कार्यक्रमाच्या तयारीसाठी देत होतो. आता शुक्रवारपासून सलग तीन दिवस मी तयारीसाठी इथेच थांबलो आहे. व्हीव्हीआयपीच्या स्वागत ते आसनव्यवस्थेपर्यंतची जबाबदारी असलेल्या टीममध्ये मी काम करतोय. यात स्वयंसेवकांची 100 जणांची आहे. कार्यक्रमाला 50 हजार जणांनी नोंदणी केली असली तरी, त्यातही 3 हजार विशेष निमंत्रित आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पत्रिका आणि बँड आवश्‍यक केला आहे. यातील एक हजार निमंत्रितांसोबत कार्यक्रमानंतर समीट असेल. त्यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेवण घेणार आहेत.'' 

Image may contain: 1 person, text

"भारतातीलच महोत्सव वाटावा, असे नियोजन सुरू आहे. मोदींच्या भाषणापूर्वी अमेरिकेतील भारतीयांचा तिथेच सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यात कथ्थक नृत्य, बॉलिवूडच्या गाण्यावर नृत्य, तसेच काहीजण गाणीदेखील म्हणणार आहेत. सभास्थळी 'ढोल ताशा मंडळ ह्युस्टन'तर्फे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले जाणार आहे. संपूर्ण कार्यक्रमासाठी एक हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत. सगळे एकाच रंगाच्या टी शर्टमध्ये दिसतील,'' अशी माहिती दबडे यांनी दिली.

दुसऱ्या राष्ट्राच्या प्रमुखाचा अमेरिकेत होणारा हा पहिलाच मोठा कार्यक्रम म्हणून आज देशभर 'हाऊडी, मोदी'ची चर्चा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील उपस्थित असतील. 'टेक्‍सास इंडिया फोरम'ने आयोजन केले असून यात 650 कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिब्रिटो यांची निवड

- स्पर्श शहा व्हील चेअरवरून गाणार 'हाऊडी मोदी'मध्ये राष्ट्रगीत

- 'कलम 370'वरून अमित शहांकडून पुन्हा शरद पवार लक्ष्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanaji Dabade expressed that our work for Howdy Modi program is going as like a home program