जन्मदात्याचे विचार सोडणाऱ्यांना वाटावी लाज; तानाजी सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tanaji Sawant criticizes shiv sena Uddhav Thackeray politics beed

जन्मदात्याचे विचार सोडणाऱ्यांना वाटावी लाज; तानाजी सावंत

बीड : ‘‘गद्दार कोण, आमचे तर सोडा, ज्यांनी तुम्हाला जन्माला घातले, त्यांची विचारधारा तुम्ही सोडून दिली, लाज वाटली पाहिजे’’, अशी कडवट टीका आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. शनिवारी (ता.२४) हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेच्या मेळाव्यात श्री. सावंत बोलत होते. श्री. सावंत म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणता माझ्या वडिलांचे छायाचित्र लावायचे नाही. मग, माझ्या शिवबाचे छायाचित्र लावायचा तुम्हाला काय अधिकार आहे. महात्मा गांधी, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, तुळजाभवानी यांचे छायाचित्र लावा आणि लावू नका म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे’’?

असा सवालही श्री. सावंत यांनी केला. ‘‘उद्धव ठाकरे यांची बौद्धिक क्षमता काय हे खऱ्या अर्थाने शिवसैनिकांना कळाले. गेल्या २० वर्षांपासून संसार मोडीत काढून कुठल्या माणसाच्या हाताखाली काम करीत होतो, हे आता कळतेय. हे फक्त सर्वसामान्य शिवसैनिकांचे रक्त सोसायचे काम करीत होते. फक्त लेना बँक होती. त्यांना देणे माहीत नव्हते. आम्हाला परत डिवचाल तर ५० खोक्यांचा अर्थ काय असतो, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत सांगू शकतात. आमच्या तोंडातून वदवून घेऊ नका! आम्हाला बोलू देऊ नका. कायम ऑनलाइन असलेले पहिले मुख्यमंत्री तर सर्वसामान्यांत मिसळणारे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत’’, असेही सावंत म्हणाले. आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले, ‘‘पहिल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यशैलीतून सामान्य शिवसैनिकांवरच नाही तर आमदार-खासदार तसेच मंत्र्यांवर रस्त्यावर फिरण्याची वेळ आणली’’, अशी टीका त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक यांची उपस्थिती होती.