टॅंकरचा पाणीपुरवठा पाडला बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

औरंगाबाद - चार दिवसांनंतरही नळाला पाणी आले नसल्याने सिडको एन-सहा मथुरानगर येथील नागरिकांनी संताप व्यक्त करीत शनिवारी (ता. पाच) सिडको एन-पाच येथील पाण्याच्या टाकीवर आंदोलन करून सुमारे दोन तास टॅंकरचा पाणीपुरवठा बंद पाडला. शुक्रवारीही (ता. चार) याच पाण्याच्या टाकीवर गुलमोहर कॉलनीतील नागरिकांनी आंदोलन केले होते.  

शहरासह सिडको-हडकोतील पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून विस्कळित झाला आहे. चार-पाच दिवसांनंतरही नळाला पाणी येत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. शुक्रवारी नागरिकांनी आंदोलन करून स्वतःच नळाला पाणी सोडून घेतले होते. त्यानंतर शनिवारी एन-सहा मथुरानगर येथील नागरिकांनी आंदोलन केले. या भागात आज सकाळी सहा वाजता पाण्याची वेळ होती; मात्र आठ वाजले तरीही पाणी न आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. या ठिकाणी नेहमीप्रमाणे टॅंकर भरण्यात येत होते. त्यामुळे पाण्याच्या टाकीचे गेट लावून नागरिकांनी टॅंकरचा पाणीपुरवठा बंद करून आंदोलन सुरू केले. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी दुपारी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली. या वेळी दोन दिवसाआडच पाणी देण्यात यावे, पाण्याच्या वेळा पाळाव्यात, चढावर असलेल्या भागाला योग्य दाबाने पाणी देण्यात यावे, अशा मागण्या करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात निर्मला घाटगे, इंदूबाई बोराडे, इंदूबाई शिसोदे, मंगल चौधरी, रामकला पळसकर, कविता शिंदे, अंजली शिंदे, प्रियांका मात्रे, संध्या खरे या महिलांसह मधुकर वाघमारे, चेतन सिंगट, डी. के. बनकर, राम कोंडके, चंद्रसिंग पाटील सहभागी झाले होते.

Web Title: tanker water supply close agitation