लातुरात भरणार नळाच्या मीटरचे अनोखे प्रदर्शन

विकास गाढवे
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

लातूरच्या पाण्याचे बिघडलेले गणित सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय लावण्यासाठी नळांना मीटर बसवण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नळांना मीटर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

लातूर : लातूरच्या पाण्याचे बिघडलेले गणित सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय लावण्यासाठी नळांना मीटर बसवण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नळांना मीटर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिले पाऊल म्हणून मीटरबाबत नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

यातूनच त्यांनी 30 नोव्हेंबर व एक डिसेंबर रोजी येथे नळाच्या मीटरचे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनासाठी मीटरचे उत्पादन करणाऱ्या दहा कंपन्यांना निमंत्रण देण्यात आले असून, प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्रांतून लातूरकरांचे प्रबोधनही करण्यात येणार आहे. 

मांजरात पाणीसाठ्याची शाश्वती कमी
काही वर्षांत मांजरा धरणात पावसामुळे होणाऱ्या पाणीसाठ्याची शाश्वती कमी झाली आहे. यामुळे कमी पाऊस होताच धरणात पाणी येत नाही व शहराला पाणीटंचाई जाणवते. टंचाईच्या काळात पाणी उपलब्धता, बचत व काटकसरीच्या प्रयत्नांची चर्चा होते. पाणी उपलब्ध होताच चर्चांना पूर्णविराम मिळतो. या परंपरेतूनच शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. उजनी धरणातून पाणी योजनेला सातत्याने हवा मिळत गेली. या स्थितीत काही वर्षात लातूरला चिकटून बसलेला पाण्याचा प्रश्न संपण्याचे नाव घेत नाही. पाणीटंचाईचा लागलेला कलंक पुसण्यासाठी लातूरकरांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

पाणीवापराचे अचूक नियोजन करण्यासाठी नळाला मीटर बसवण्याचा एकच पर्याय आहे. मात्र, या पर्यायाची अंमलबजावणी विविध कारणांनी मागे पडली आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रीकांत यांनी पुढाकार घेतला असून नळाच्या मीटरबाबत नागरिकांत असलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न असणार आहे. यासाठी आयोजित मीटरच्या प्रदर्शनात कंपन्या त्यांच्या मीटरची व त्याच्या उपयुक्ततेची माहिती देणार आहेत. यानिमित्ताने होणाऱ्या चर्चासत्रातून मीटरसाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. 

65 हजार नळांना मीटर 

शहरात सध्या 56 हजार पाचशे नळजोडण्या असून अमृत योजनेतील जलवाहिनीनंतर 65 हजार नळजोडण्या होतील. या सर्व नळांना मीटर बसवण्याचे नियोजन आहे. महापालिकेने तसा ठरावही केला असून वीज मीटरप्रमाणेच नळाच्या मीटरवरील रीडिंगनुसार पाण्याचे बिल नागरिकांना भरावे लागणार आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक हजार लिटरसाठी दहा रुपये 75 पैसे दर निश्‍चित केला होता. आता त्याची फेरआकारणी करावी लागणार आहे.

नळाच्या मीटरची रीडिंग घेण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता करावी लागणार आहे. या सर्व आव्हानांवर मात करत प्रदर्शनातून नळाला मीटर बसवण्यासाठी नागरिकांच्या मनाची तयारी करण्याचा प्रयत्न होणार आहे. प्राचार्य, विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांना प्रदर्शनासाठी निमंत्रित करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे कार्यकारी अभियंता विजय चोळखणे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tap meter exhibition in Latur