कांद्याची गोडी चाखयची...तर मोजा अतिरिक्त पैसे      

File photo
File photo

देवगावफाटा : भाजीला चवदार होण्यासाठी आणि जेवणासोबत कांद्याची गोडी चाखण्यासाठी कांद्याने प्रत्येकाला एकप्रकारे भुरळ घातलेली आहे. त्यामुळे जेवणासोबत कांदा हे समीकरणच झाले आहे. मात्र, काही दिवसांपासून बाजारात कांद्याची आवक मंदावल्याने कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचा परिणाम काही हॉटेलांमधून ग्राहकांकडून कांद्याची मागणी झाल्यास स्वतंत्र दर आकारले जात आहेत.

परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतात अनेक दिवस पाणी साचून राहिल्याने या पाण्यामुळे उभे पीक जागेवर सडून गेले आहे. त्यामुळे बाजारात ठोक कांद्याची आवक घटली आहे. येणाऱ्या काही दिवसांत कांद्याचे भाव अजून वाढतील व जानेवारीनंतर नवीन कांदा बाजारात येण्याची सुरवात झाल्यावर भाव हळूहळू कमी होतील. परंतु, आज कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. बाजारात चांगल्या प्रतीच्या कांदा १०० ते १२० रुपये प्रतिकिलो विकत घ्यावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील हॉटेल, ढाबा, उपहारगृह, भेळ सेंटर्स या ठिकाणी कांद्याचा वापर मोठ्या काटकसरीने केला जात आहे.

एका प्लेटसाठी पाच रुपये 
कांद्याची जागा आता काकडी व पत्ताकोबीने घेतली आहे. एवढेच काय कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे हॉटेलांमध्ये ग्राहकांकडून कांद्याची मागणी झाल्यास काही ठिकाणी कांद्यासाठी स्वतंत्र^दर आकारले जात आहेत. एक प्लेटमागे साधारणतः पाच रुपये आकारले जात आहेत. त्यामुले परिसरातील हॉटेल, ढावे, भेळसेंटर्स, उपहारगृहचालकांना कांद्याच्या भाव वाढीचा फटका बसत आहे. कांद्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे भाव न वाढविता, शक्य होईल तितका कांद्याचाच वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
गृहिणींकडूनही काटकसर
कांद्याचा वापर बहुतांश सर्वच भाज्यात केला जातो. एरव्ही चार जणांच्या भाजीला एक कांदा वापरला जायचा. परंतु, तिथे आता गृहिणींकडून अर्ध्याच कांद्याचा वापर केला जात आहे. कांदा खरेदी करताना व वापर करताना त्यात मोठी काटकसर करण्यात येत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे          प्रत्येक भाज्यांमध्ये कांदा हा सर्रास वापरल्या जातो. कांद्यामुळे भाज्यांची चव अधिक खुलते, चविष्ट आणि चमचमीत पदार्थ तयार करायचे असतील तर कांदा हा लागतोच. मात्र, कांद्याचा वाढलेला भाव लक्षात घेता, एकीकडे भाज्यांमध्ये कांद्याचा जपून वापर करावा लागत आहे. तर दुसरीकडे पदार्थांची चव खराब न होऊ देता वर्षानुवर्षे जपलेल्या ग्राहकांनाही त्याची झळ बसणार याचाही विचार करावा लागत आहे. त्यामुळे आता कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
- वसंत गरड (हॉटेलमालक, देवगावफाटा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com