पुरेसा अनुभव नसतानाही शिक्षकांना तपासाव्या लागताहेत उत्तरपत्रिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

औरंगाबाद - राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद विभागातर्फे बारावीची परीक्षा घेण्यात आली; मात्र विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारामुळे चक्क बोर्डाने पुरेसा अनुभव नसलेल्या शिक्षकास बळजबरीने उत्तरपत्रिका तपासण्यास दिल्याचा प्रकार घडल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

औरंगाबाद - राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद विभागातर्फे बारावीची परीक्षा घेण्यात आली; मात्र विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारामुळे चक्क बोर्डाने पुरेसा अनुभव नसलेल्या शिक्षकास बळजबरीने उत्तरपत्रिका तपासण्यास दिल्याचा प्रकार घडल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारानंतर परीक्षा मंडळासमोर वेळेवर निकाल लावण्याचे आव्हान होते. परिणामी मंडळातर्फे अनुदानित शिक्षकांना प्रमाणापेक्षा जास्त पेपर तपासण्यास देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. परीक्षा बोर्डाच्या या मनमानीपुढे शिक्षकही हतबल होताना दिसत आहेत. एका शिक्षकास या कामासाठी पुरेसा अनुभव नसतानाही उत्तरपत्रिका तपासण्यास दिल्याने शिक्षकाची परिस्थिती "इकडे आड, तिकडे विहीर' अशी झाली आहे.

निकाल वेळेवर लावण्यासाठी बोर्डासमोरील आव्हान कायम असून अजूनही बोर्डात उत्तरपत्रिकांचे 160 पेक्षा जास्त गठ्ठे पडून आहेत.

"त्या' संस्थांची कारवाई होणार?
विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यात नकार दिल्यानंतर बोर्डातर्फे उत्तरपत्रिका तपासा अन्यथा संस्थांची मंडळ मान्यता रद्द करून यंदा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्याची तंबी दिली होती. तसा खुलासाही विभागातील साधारण 500 प्राचार्य, मुख्याध्यापकांकडून मागविला होता; मात्र यातून केवळ 12 ते 15 मुख्याध्यापक, प्राचार्यांनी खुलासा दिल्याचे बोर्डाच्या सचिव वंदना वाहूळ यांनी सांगितले. याशिवाय काही प्राचार्यांनी संप सुरू आहे, शाळेतील शिक्षक निवृत्त झाले, काहीजण एप्रिलला निवृत्त होणार आहेत, असे कळविले आहे.

काय आहे पात्रता?
बारावीचे पेपर तपासण्यासाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी, बी.एड. आणि कमीत कमी एका वर्षाचा अध्यापनाचा अनुभव अशा प्रकारची पात्रता असते. पेपर तपासण्यास दिलेल्या शिक्षकाने मात्र आपल्याला विनाअनुदानित तत्त्वावर पुरेसे दहा महिनेही पूर्ण न झाल्याचे सांगितले. याशिवाय परीक्षा मंडळाने परीक्षेच्या काळात पात्रता नसतानाही काम करून घेतल्याचे सांगितले.

कालमर्यादेत करावे लागणारे काम लक्षात घेता निकाल वेळेवर लावण्यासाठी धडपड सुरू आहे. अनुभव नसलेल्या शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासणीस गेलेल्या प्रकाराची चौकशी केली जाईल.
- वंदना वाहूळ, विभागीय सचिव, परीक्षा मंडळ, औरंगाबाद

Web Title: teacher cheaking answer sheet without experience