लातूरात शिक्षकांनी मागितली भीक; सात वर्षांपासून वेतन नसल्याने उपासमार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

अनुदानित शाळेतील अतिरिक्त तुकडीवरील विनाअनुदानित शिक्षक तब्बल सात वर्षांपासून विनावेतन काम करत आहेत, पण सरकारने अद्याप त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे त्या सर्वांनी एकत्रित येऊन शिक्षकदिनी शहरातील रस्त्यांवर भीक मागो आंदोलन केले.

लातूर : शिक्षक दिन हा शिक्षकांसाठी गौरवाचा दिवस असतो; पण याच दिवशी लातूरमधील तीनशेहून अधिक शिक्षक रस्त्यावर उतरून त्यांनी भीक मागत आपल्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांप्रमाणेच आमच्याही आत्महत्येची वाट पाहत अाहात का? असा संतप्त सवाल त्यांनी सरकारसमोर उपस्थित केला.

अनुदानित शाळेतील अतिरिक्त तुकडीवरील विनाअनुदानित शिक्षक तब्बल सात वर्षांपासून विनावेतन काम करत आहेत, पण सरकारने अद्याप त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे त्या सर्वांनी एकत्रित येऊन शिक्षकदिनी शहरातील रस्त्यांवर भीक मागो आंदोलन केले. भीक मागण्यासाठी हातात थाळी घेऊन, सरकारच्या विरोधात घोषणा देत आणि पगार नसल्याने कुटूंबावर आलेले उपासमारीचे संकट अापल्या शब्दात सांगत शिक्षकांनी महात्मा गांधी चाैकापासून आंदोलनाला सुरवात केली. यासाठी राष्ट्रीय शिक्षक परिषदेने पुढाकार घेतला आहे. 

latur

शाळा बंद आंदोलन, हिवाळी अधिवेशनादरम्यान धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन अशी वेगवेगळी आंदोलने आम्ही शांततामय मार्गाने केली; पण सरकारने वारंवार आम्हाला केवळ आणि केवळ आश्‍वासनेच दिली. हिवाळी अधिवेशनादरम्यान केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तुमचे वेतन तातडीने मिळेल, असे सभागृहात सांगितले होते. यापैकी एकही अाश्‍वासन सत्यात उतरले नाही. वेतन नसेल तर आम्ही जगायचं कसं, कुटूंब चालवायचं कसं...? अशी व्यथा आंदोलनात सहभागी शिक्षकांनी ‘सकाळ’कडे मांडली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher does not have salary from seven years in latur