शिक्षण विभागात शिक्षिकेचा धिंगाणा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बुधवारी (ता. 30) सकाळी एका शिक्षिकेने चांगलाच गोंधळ घातला. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत महिला कर्मचाऱ्यांसह पुरुषांनाही चांगलेच जेरीस आणले. या प्रकारामुळे शिक्षण विभागातील 70 कर्मचारी दिवसभर जिल्हा परिषदेच्या गार्डनमध्येच बसून होते. 

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बुधवारी (ता. 30) सकाळी एका शिक्षिकेने चांगलाच गोंधळ घातला. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत महिला कर्मचाऱ्यांसह पुरुषांनाही चांगलेच जेरीस आणले. या प्रकारामुळे शिक्षण विभागातील 70 कर्मचारी दिवसभर जिल्हा परिषदेच्या गार्डनमध्येच बसून होते. 

फुलंब्री तालुक्‍यातील धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेली शिक्षिका आठ दिवसांपासून शिक्षण विभागात येऊन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत आहे. इतकेच नव्हे, तर अधिकाऱ्यांनासुद्धा या महिलेने शिवीगाळ केली. तिच्याविरुद्ध आतापर्यंत अनेक तक्रारी आहेत. शाळेतसुद्धा तिने एका विद्यार्थ्याचा गळा दाबल्याची तक्रार आहे; तसेच शिक्षण विभागातील एका कर्मचाऱ्याच्या अंगावर तिने फाईल फेकून मारली होती. पोलिस ठाण्यातसुद्धा तक्रारी दिल्या; मात्र या शिक्षिकेने उलट क्रॉस कम्प्लेंट केली होती. 

या शिक्षिकेविरुद्ध कार्यवाही प्रस्तावित करून फाईल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविली आहे; मात्र त्यावर निर्णय झालेला नाही. गोंधळ घातल्यानंतर बुधवारी 70 कर्मचारी दिवसभर जिल्हा परिषद गार्डनमध्ये बसून होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही "तुमच्या पातळीवर प्रश्‍न सोडवून घ्या,' असे सांगत कर्मचाऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. यानंतर बराच वेळ कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच होते. या शिक्षिकेवर कार्यवाही करावी, तिला वैद्यकीय मंडळाकडे पाठवावे, कार्यालयात येण्यास पायबंद घालावा, अशी मागणी सर्व कर्मचारी, कर्मचारी संघटनेने केली आहे. 

 

शालेय व्यवस्थापन समितीने घेतला होता कार्यमुक्ततेचा ठराव 

शाळेतील मुलांना मारहाण करून एका मुलाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यानंतर फुलंब्रीचे गटशिक्षणाधिकारी यांना बोलावून पंचनामा करण्यात आला होता. गावात अनेक पालकांच्या या शिक्षिकेविरुद्ध तक्रारी असल्याने शालेय व्यवस्थापन समितीने तिला कार्यमुक्त करण्याचा ठराव घेतला होता. तिचे निलंबन करावे, यासाठी फुलंब्री गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेकडे प्रस्तावसुद्धा पाठविला. शाळेने 15 ऑगस्ट 2016 अगोदरच या शिक्षिकेला शाळेतून कार्यमुक्त केले आहे. तेव्हापासून या शिक्षिकेने शिक्षण विभागाला जेरीस आणले आहे. 

Web Title: The teacher razzle