हिंगोलीत एक हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनी रात्र काढली जागून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

मध्यरात्री बदल्‍याचे आदेश लॉगिनवर प्राप्‍त झाल्‍यानंतर आज सकाळपासून बदल्‍यांचे आदेश डाऊनलोड करून घेण्यासाठी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्‍के, जिल्‍हा समन्वयक सचिन बेलोकर यांच्‍यासह उपशिक्षणाधिकारी कार्यालयात हजर झाले. दुपारपर्यंत यादी काढण्याचे काम सुरु होते.

हिंगोली : जिल्‍ह्‍यात रविवारी (ता.२७) सुमारे एक हजारपेक्षा शिक्षकांनी बदली आदेशाच्‍या धसक्‍याने रात्र जागून काढली. मध्यरात्री निघालेल्‍या बदल्यांचे आदेश घेण्यासाठी सकाळपासून शिक्षण विभागासमोर शिक्षकांनी गर्दी केली होती.

जिल्‍ह्‍यात ऑनलाईन बदलीसाठी सुमारे अडीच हजार शिक्षकांनी अर्ज दाखल केले होते. शासनाच्‍या निकषानुसार विविध चार संवर्गात शिक्षकांचे बदली अर्ज दाखल झाले होते. मागील वर्षापासून सुरु असलेल्‍या या बदल्‍यांची प्रक्रिया यावर्षी तरी पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्‍थित केला जात होता. मात्र मागील आठवड्यात शासनाने आंतरजिल्‍हा बदलीच्‍या १०७ शिक्षकांचे आदेश काढल्‍यानंतर आता जिल्‍ह्‍यांतर्गत बदल्‍या होणार हे स्‍पष्ट झाले होते. रविवारी रात्री बदल्‍यांचे आदेश सीईओ लॉगिनवर प्राप्‍त होणार असल्‍यामुळे आदेशाच्‍या धसक्‍याने शिक्षकांनी अक्षरशः रात्र जागून काढली.

मध्यरात्री बदल्‍याचे आदेश लॉगिनवर प्राप्‍त झाल्‍यानंतर आज सकाळपासून बदल्‍यांचे आदेश डाऊनलोड करून घेण्यासाठी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्‍के, जिल्‍हा समन्वयक सचिन बेलोकर यांच्‍यासह उपशिक्षणाधिकारी कार्यालयात हजर झाले. दुपारपर्यंत यादी काढण्याचे काम सुरु होते. तर सकाळपासूनच शिक्षकांनीही शिक्षण विभागासमोर गर्दी केली होती. बदली आदेश मिळण्यासाठी उशिर होत असल्‍याने अनेक शिक्षकांनी झाडाच्‍या सावलीचा आसरा घेतला. याबाबत शिक्षणाधिकारी श्री. सोनटक्‍के यांच्‍याशी संपर्क साधला असता बदली आदेश डाऊनलोड करण्याची प्रक्रिया सुरु असून सायंकाळपर्यंत सर्व शिक्षकांना बदली आदेश दिले जाणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्ट केले.

Web Title: teacher transfer issue in Hingoli

टॅग्स