Coronavirus : नागरिकांच्या सर्वेक्षणाला बीएलओ, शिक्षकांची दांडी

Teachers, BLO Were Absent For Local Survey
Teachers, BLO Were Absent For Local Survey

लातूर - कोरोना या साथरोगाच्‍या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून महानगरपालिका हद्दीतील ५० वर्षांवरील सर्व नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या उपक्रमाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला आहे. सकाळी सकाळी तर उठा-उठा सर्वेक्षणाला चला असे म्हणण्याची वेळ पथकप्रमुखांवर आली. तरीदेखील अनेक बीएलओ, शिक्षकांनी या सर्वेक्षणाला दांडी मारली. ग्रामीण भागातून आशा वर्कर्सना बोलाविण्याची वेळ आली. अनेक ठिकाणचे पल्स ऑक्सिमीटरही बंद पडले. अशा परिस्थितीत सर्वेक्षणाचा पहिला दिवस संपला आहे. रविवारी (ता. १२) अशाच पद्धतीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दांडी मारणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे. 

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या हद्दीत शहरातील ५० वर्षांवरील नागरिक; तसेच ५० वर्षांखालील आजारी व्यक्तींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. ता. ११ व १२ जुलै या कालावधीत हे सर्वेक्षण होत आहे. पहिल्याच दिवशी या सर्वेक्षणाचा नियोजनाअभावी फज्जा उडाला. या सर्वेक्षणासाठी मतदान यादीचा आधार घेण्यात आला होता. पथकप्रमुख म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बीएलओंची महत्त्वाची भूमिका होती; तसेच या पथकात आशा वर्कर, आरोग्‍य सेविका, शिक्षकांचा समावेश होता. मोठ्या प्रमाणात हे सर्वेक्षण असल्याने त्याचे योग्य नियोजन होणे अपेक्षित होते.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

संबंधितांना वेळेत आदेश जाणेही गरजेचे होते; पण महसूल यंत्रणेने अचानक महापालिकेला असे संबंधितांना आदेश काढण्याचे आदेश दिले. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यात कंटेनमेंट झोन वाढत असून, त्याचा ताण महापालिकेच्या यंत्रणेवर आहे. त्यात अचानक असे आदेश दिल्याने गोंधळ उडाला. त्याचा परिणामही दिसून आला. पथकप्रमुखांकडे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या याद्या देण्यात आल्या होत्या. त्यावर त्यांनी सकाळी-सकाळी फोनही लावले. अनेक शिक्षकांनी आपल्याला असे आदेशच आले नाहीत असे सांगून टाकले. त्यामुळे अनेक शिक्षकांनी दांडी मारली. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असून अनेक ठिकाणी बीएलओंनी दांडी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे हजर असलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. एका बूथवरचे दुसऱ्या बूथवर कर्मचारी पाठवता पाठवता महापालिकेच्या नाकीनऊ आले. ग्रामीण भागातून आशा वर्कर मागवल्या गेल्या.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दुपारनंतर हे सर्वेक्षण कसे तरी सुरळीत सुरू झाले. यात पल्स ऑक्सिमीटर बंद पडण्याच्या तक्रारीमुळेदेखील महापालिकेची यंत्रणा त्रस्त झाली. अशा परिस्थितीत रविवारीही हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. सध्या कोरोना हा महत्त्वाचा विषय आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही अनेकांनी दांडी मारली आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई होणार का? याकडे लक्ष लागले आहे. 

(संपादन : विकास देशमुख) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com