अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई करणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

औरंगाबाद - शिक्षण विभागाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शहर, जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची (माध्यमिक स्तर) शनिवारी (ता. 24) बैठक पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढण्यासाठी उपक्रमांतर्गत राबविण्याच्या गोष्टी, संच मान्यता, अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरल प्रणाली, तसेच ऑनलाईन पद्धतीचा अवलंब आदी विषयांवर ही बैठक आयोजित केल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) लता सानप यांनी दिली.

बैठकीदरम्यान अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती या संदर्भात विद्यार्थ्यांचे खाते उघडणे आदींविषयी पावर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली. दहावीत तीनपेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी "सेतू कौशल्य' हा उपक्रम सुरू करण्यात आला आला असून, त्याविषयीही माहिती बैठकीत देण्यात आल्याचे श्रीमती सानप यांनी सांगितले.

त्याचबरोबर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाविषयी चर्चा करण्यात आली. काही संस्थाचालकांच्या दबावामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यास मुख्याध्यापक नकार देत आहेत. या विषयावर बैठकीदरम्यान मुख्याध्यापकांना चांगलेच धारेवर धरले. अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करून घ्या. अन्यथा तुमच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, याचे उत्तर द्या, असा पवित्रा माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासंबंधीचे पत्रही शाळांना देण्यात आले आहे, अशी माहिती श्रीमती सानप यांनी दिली.

Web Title: Teachers do not act on the principal adjustment