शिक्षकांनी ई-लर्निंग संकल्पना प्रभावीपणे राबवावी - विजयसिंह पंडित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

बीड - शिक्षक हे समाजसुधारक असून, त्यांनी दर्जेदार शिक्षण देऊन सुसंस्कृत नवीन पिढी घडवावी. तसेच जिल्ह्यात ई-लर्निंग संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले.

बीड - शिक्षक हे समाजसुधारक असून, त्यांनी दर्जेदार शिक्षण देऊन सुसंस्कृत नवीन पिढी घडवावी. तसेच जिल्ह्यात ई-लर्निंग संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील अकरा प्राथमिक, तर आठ माध्यमिक व एक विशेष शिक्षक, अशा एकूण वीस शिक्षकांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सोमवारी (ता.५) सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात श्री. पंडित बोलत होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस अधीक्षक अनिल पारसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती कमल मुंडे यांची उपस्थिती होती. सुरवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

श्री. पंडित म्हणाले की, शिक्षकांबद्दलचा समाजातील दृष्टिकोन चांगला राहील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. जिल्ह्यात ई-लर्निंग संकल्पना प्रभावीपणे अवलंबिण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुकास्तरावर शिक्षक पुरस्कार देण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, दर्जेदार शिक्षणामुळे सुसंस्कृत नवीन पिढी घडून समाज अधिक विकसित होईल.

शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षण घेण्यात आले असून, त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यावर चांगले संस्कार घडवावेत, असे आवाहन केले. पोलिस अधीक्षक श्री. पारसकर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विविध जाती-धर्माची मुले-मुली शिक्षण घेत असल्याने या शाळा खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभावाची संस्कृती जोपासण्याचे काम करीत असल्याचे मत व्यक्‍त केले. पुरस्कारप्राप्त शिक्षक राजेंद्र लाड व बाबासाहेब केदार यांनीही मनोगत व्यक्त केले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य देविदास धस आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक सभापती बजरंग सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्रावण गिरी व विद्या लहाने यांनी केले. निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांनी आभार मानले.

Web Title: Teachers effectively implementing e-learning concept - Pandit Vijay Singh