पुणे : तेजसाला करायचे होते माॅडेलिंगमध्ये करिअर, पण त्यापूर्वीच...

विकास देशमुख
बुधवार, 4 डिसेंबर 2019

'एमबीए'साठी ती पुण्यात राहायला गेली होती. तेजसासोबत तिची आई जयश्री, बहिणी श्रद्धा व तृप्ती याही पुण्यात राहत होत्या.

औरंगाबाद -  बीड शहरातील पंचशीलनगरात राहणाऱ्या तेजसा पायाळ हिचा पुण्यात गुढ मृत्यू झाला. प्रथमदर्शनी पुराव्यावरून कुणीतरी तेजसाचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. एमबीए (एचआर) केलेल्या तेजशाला माॅडेलिंगमध्ये आवड होती. त्यातच तिला करिअर करायचे होते. पण, सोबत नोकरीही करायची होती. मात्र त्यापूर्वीच तिचा कुणीतरी खून केला.

तेजसाचे कुटुंब मूळ बीड जिल्ह्यातील कुंभार वडगाव येथील रहिवासी आहे. तिचे वडील श्यामराव पायाळ हे रजिस्ट्री कार्यालयातून सेवानिवृत्त झाले. वडिलांच्या नोकरीमुळे पायाळ कुटुंब 20 वर्षांपासून बीडला स्थायिक झाले. तेजसाने पदवीपर्यंचे शिक्षण बीडमध्येच पूर्ण केले. 'एमबीए'साठी ती पुण्यात राहायला गेली होती. तेजसासोबत तिची आई जयश्री, बहिणी श्रद्धा व तृप्ती याही पुण्यात राहत होत्या. श्रद्धा व तृप्तीचेही शिक्षण पुण्यात सुरू आहे. गावी शेतीकडे लक्ष द्यावे लागत असल्याने वडील बीड येथेच राहत होते. दिवाळीसाठी दीड महिन्यापासून तेजसा, तिची आई आणि दोन्ही बहीण बीडला आल्या होत्या. दिवाळी झाल्यानंतर तेजसा पंधरा दिवसांपूर्वी एकटीच पुण्याला गेली होती. आई व दोन्ही बहिणी मात्र इकडे बीडलाच होत्या. शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी तेजसाचे आई जयश्री यांच्याशी बोलणे झाले होते. शनिवारी सकाळी कुटुंबीयांनी नेहमीप्रमाणे तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, केवळ रिंग जात होती. तेजसाकडून काहीह प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पायाळ कुटुंबीय चिंतेत होते. अखेर सोमवारी आई जयश्री या पुण्यात गेल्या. दरवाजा बाहेरून बंद केला होता. त्यांनी त्यांच्याकडील चावीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना तेजसा गादीवर मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, याप्रकरणी तत्काळ सिंहगड पोलिसांना माहिती देण्यात आली.

Image may contain: 1 person, close-up
Tejasa Payal

 
मुलाखतीसाठी आला होता काॅल

तेजसा हिने एमबीए-एचआर झाल्यानंतर काही ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार तिला सेनापती बापट रस्त्यावरील एका नामांकित कंपनीमध्ये मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. सोमवारी (ता. एक) संबंधित कंपनीमध्ये तेजसाची मुलाखत होती. मात्र, त्याच दिवशी तिला मृत्यूने गाठले. 

ओळखीच्या व्यक्तींवर कुटुंबाचा संशय 

तेजसासमवेत तिच्या आईचे शनिवारी रात्री साडेदहा वाजता मोबाईलवर बोलणे झाले होते. त्या वेळी आपली तब्येत ठीक नसून घरातच आराम करीत असल्याचे तिने आईला सांगितले होते. त्यानंतर तिच्या आईने मध्यरात्री फोन केला तेव्हापासून तिचा फोन बंद होता. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी तिच्या ओळखीच्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे.   
 

दारूच्या बाटल्या अन् शरीरावर जखमा

तेजसाच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. शिवाय घरात तीन ते चार दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे या प्रकरणात मृत तरुणीच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. घरात बेडवर तिचा मृतदेह होता. तर घरातले सगळे सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्यामुळे चोरीचा संशयदेखील पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी संपूर्ण घराची पाहणी केली असून, संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात मृत तरुणीच्या कुटुंबीयांची आणि तिच्या जवळच्या लोकांची चौकशी करण्यात येणार असून, तिचे कॉल रेकॉर्डही पोलिसांनी मागवले आहेत.

संबंधित बातमी - पुणे : तरुणीची आत्महत्या नव्हे, खूनच 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejasa Payal's Family Information