बाई, बाई झोंबतो गारवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

थंडीत लहान मुलांबरोबरच वृद्धांनीही उबदार कपडे परिधान करावेत. थंड पदार्थ, फ्रीजमधील पाणी टाळावे, थंडीत लहान मुलांचा प्रवास टाळावा. आहारामध्ये ताजे फळे, पाल्याभाज्या, तूप, दुधापासून बनवलेले इतर पदार्थ, स्निग्ध पदार्थ घ्यावेत.  
- डॉ. हनुमंत पारखे, बालरोग तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय.

पारा अठरावर, थंडीचा जोर, उबदार कपड्यांना मागणी वाढली   
बीड  - तापमानाचा पारा घसरत असून, थंडीचा जोर वाढला आहे. दिवाळीपूर्वी ३५- ३८ अंशांवर असलेले तापमान मागील दोन दिवसांपासून कमी होत आहे. मंगळवारी (ता. आठ) बीडमध्ये १८ अंश तापमान नोंदविले गेले. त्यामुळे उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. 

यंदा चांगले पर्जन्यमान झाले असल्याने जलस्रोत पूर्ण भरलले आहेत. बहुतांश ठिकाणी शेतात आणखी ओलावा आहे. मागील तीन वर्षे सतत दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे थंडीही फार नव्हती. मात्र, यंदा चांगले पर्जन्यमान झाल्याने दिवाळी संपताच थंडीला सुरवात झाली आहे. सध्या पारा १८ अंशांवर येऊन ठेपल्याने कडाक्‍याची थंडी पडली आहे. नागरिक उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत.

आरोग्यदायी थंडी
उन्हाळा, पावसाळा या ऋतूंपेक्षा हिवाळा हा आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो.  बहुतांश सर्वांचा हिवाळा हा ऋतू आवडता असतो. हिवाळ्यामध्ये व्यायाम, योगासने केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. ही रोगप्रतिकारशक्ती उन्हाळा व पावसाळ्यापर्यंत कामी येते. त्यामुळे थंडीला सुरवात होताच बहुतांश जण व्यायाम, योगासने करण्यास सुरवात करतात. डॉक्‍टरही व्यायाम व पौष्टिक अन्न खाण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे नागरिक सध्या उबदार कपड्यांबरोबरच पौष्टिक खाद्यपदार्थ खरेदीवर भर देत आहेत.

Web Title: temperature decrease in beed