तापमानातील घट ही नैसर्गिक बदलांची नांदी!

आदित्य वाघमारे
बुधवार, 3 मे 2017

पुढील उन्हाळे काहीसे असतील आल्हाददायक
औरंगाबाद - गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात होणारी लाही काहीशी कमी होत आहे. तापमानाच्या आकड्यांमध्ये होणारी ही घट यापुढेही होणार आहेच. काही काळ आल्हाददायक पद्धतीने जाणारा असला तरी ही आगामी काळात होणाऱ्या नैसर्गिक बदलाची नांदी आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

पुढील उन्हाळे काहीसे असतील आल्हाददायक
औरंगाबाद - गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात होणारी लाही काहीशी कमी होत आहे. तापमानाच्या आकड्यांमध्ये होणारी ही घट यापुढेही होणार आहेच. काही काळ आल्हाददायक पद्धतीने जाणारा असला तरी ही आगामी काळात होणाऱ्या नैसर्गिक बदलाची नांदी आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

1 मे 2016 ला औरंगाबादेतील तापमानाचा कमाल पारा 41.3, तर किमान पारा हा 26.5 अंश एवढा होता. त्या तुलनेत सोमवारी (1 मे 2017) ला हा आकडा 39.4 आणि 21.0 अंशांवर खाली आला.

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सूर्यावर सुरू असेल्या घडामोडींमुळे आगामी उन्हाळ्यामधील हा आकडा अधिक घसरण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. उन्हाळ्यात होणारी अंगाची लाही यंदा घटली असली तरी तापमानात होणारी ही घट पर्यावरणात मोठे बदल होणार असल्याचे संकेत देणारी ठरणार आहे.

सूर्यावर पडणारे डाग आणि त्यामुळे होणारे बदल हे यासाठी कारणीभूत ठरत आहेत. डाग तयार होणे आणि ते नाहीसे होणारी प्रक्रिया साधारणतः साडेअकरा वर्षांची असल्याने या काळात सूर्याची ऊर्जा देण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे संपूर्ण जगात अशाप्रकारच्या तापमानाची घट पाहायला मिळते आहे.

उन्हाळा घटणार, हिमयुगाचाही अनुभव
"सोलार सायकल' अर्थात सूर्यावर होणाऱ्या बदलांमुळे उन्हाळ्याचा कालावधीही घटण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तीव्रतेने मिळणारे 120 दिवसांचे ऊन कमी होईल असाही अंदाज आहे. त्याच्यामुळे तापमनात घट होईल; पण आगामी काळात निसर्गाच्या चक्रात बदल होणार असल्याची सतर्कता सांगणाऱ्या या घडामोडी आहेत. तापमानात होणारी घट इतकी कमालीची असेल की, मराठवाड्यासारख्या भागाचे आकडे 4.5 अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्‍यता नकारता येत नाही. त्याच्यामुळे मराठवाड्यासारख्या कोरड्या प्रदेशालाही काही काळ "हिमयुग' अनुभवता येऊ शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

पावसाचा ट्रेंडही बदलणार
उन्हाळ्यातील पर्यावरणाच्या घडामोडींवर पावसाळ्याचे अंदाज बांधले जातात. तापमानात होणारी घट आगामी काळात पावसावरही परिणाम करणारी ठरणार आहेत. अचानक गारपीट आणि हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नगरांमध्ये होणारा हिमवर्षाव हा निसर्गातील बदलांबाबत भाष्य करणारेच आहेत. आगामी काळात पावसाचे अडाखे बदलतील आणि पर्जन्यमानातही बदल पाहायला मिळतील, असा अंदाज आहे.

सूर्यावर होणाऱ्या बदलांमुळे तापमानात घसरण पाहायला मिळते आहे. यामुळे उन्हाळ्याचे दिवस कमी होतील आणि किमान पारा 4.5 अंशांपर्यंत घसरू शकतो. सूर्याचा ऊर्जास्रोत घटल्याने पावसाळ्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शहारातील तापमान ग्रामीण भागाच्या तुलनेत कार्बनमुळे अधिक राहील. तापमान कमी होणार असल्याने हिमयुगाचाही अनुभव घेता येईल. तापमानातील घटीची अनुभूती ही साधारणतः 2032 पर्यंत येईल.
- श्रीनिवास औंधकर, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ

Web Title: temperature decrease is a natural changes