बीडमध्ये मायलेकीसह दहाजणांनी कोरोनाला हरविले, जिल्ह्यात १५ जण कोरोनामुक्त  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

  • केज, माजलगावच्या रुग्णालयांतही यशस्वी उपचार 
  • आजही १४ जणांना कोरोनामुक्तीनंतर डिस्चार्ज 
  • जिल्ह्यात रविवारपर्यंत १५ जण कोरोनामुक्त 

बीड -  कोरोना विषाणूच्या फैलावाचे जिल्ह्यातील चित्र जणू सापशिडीच्या खेळाप्रमाणे झाल्याचे आकड्यांवरून दिसत आहे. दोन महिने कोरोनाशून्य असलेल्या जिल्ह्यात मागच्या १४ दिवसांत (ता. २९) पर्यंत पाहता पाहता ६२ पर्यंत गेली. पण, मागच्या चार दिवसांत कोरोनामुक्तांचा आकडाही वाढत आहे. आतापर्यंत पाचजण कोरोनामुक्त झाल्यानंतर शनिवारी (ता. ३०) पुन्हा मायलेकींसह दहाजणांनी कोरोनाला हरविले आणि यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून घर गाठले. शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या दहा रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालय व केजच्या उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार झाले. 

विशेष म्हणजे रविवारी (ता. ३१) जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका जोखमीच्या रुग्णासह इतर माजलगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या १३ अशा १४ जणांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. या तीनही रुग्णालयांतील टीमला कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात यश आले आहे.  सुरवातीपासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची उत्तम अंमलबजावणी करून राज्यासमोर आदर्श पॅटर्न उभा करणाऱ्या जिल्ह्यात कोरोना शून्य होता. परंतु मधल्या काळात शासनाने बाहेर अडकलेल्या मजूर, नोकरदार, विद्यार्थी यांना इच्छितस्थळी जाण्याची परवानगी दिल्यानंतर मुंबई, पुणेसह विविध भागांतील लोक जिल्ह्यात दाखल होऊ लागले आणि जिल्ह्याचे कोरोनारुग्णाचे खाते ओपन झाले.

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

१६ मे रोजी जिल्ह्यात मुंबईहून आलेले पहिले दोन कोरोना रुग्ण सापडले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईहून नातेवाइकांकडे आष्टी तालुक्यात आलेल्या एकाच कुटुंबातील सातजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत समोर आले. यातील एका वृद्धेचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला. दरम्यान, हळूहळू कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत ६२ पर्यंत गेली. विशेष म्हणजे कोरोनाग्रस्त आढळलेल्यांमध्ये अपवाद वगळता सर्वजण मुंबईहूनच आलेले आहेत. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

१४ जणांना डिस्चार्ज 
जिल्ह्यात प्रथम आढळलेल्या पिंपळा (ता. आष्टी) येथील रुग्णावर नगरला यशस्वी उपचार झाले. त्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा आढळलेल्या ईटकूर (ता. गेवराई) मुलीला व हिवरा (ता. माजलगाव) येथील तरुणाला बुधवारी (ता. २७) डिस्चार्ज दिल्यानंतर शुक्रवारी (ता. २९) कवडगाव थडी (ता. माजलगाव) येथील एका ६५ वर्षीय वृद्धेसह ३५ वर्षीय तरुणाला डिस्चार्ज करण्यात आले. या चौघांवरही जिल्हा रुग्णालयाच्या कोविड हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. यानंतर शनिवारी जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या बीड शहरातील तीन पुरुषांसह एक महिला आणि एका मुलीसह पाटोदा शहरातील एका पुरुषासह तालुक्यातील एका महिलेसह तिच्या मुलीला डिस्चार्ज करण्यात आले. तर, केज उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या याच तालुक्यातील केळगाव येथील महिला व चंदनसावरगाव येथील तरुणावरही यशस्वी उपचार झाले.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार... 

दहा जणांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १५ वर पोचली आहे. दरम्यान, रविवारीही एका जोखमीच्या रुग्णासह इतर १३ अशा १४ जणांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. या रुग्णांमध्ये पाटोदा येथील जोखमीच्या रुग्णासह नित्रुड (ता. माजलगाव), कुंडी (ता. धारूर) व वडवणीच्या रुग्णांचा समावेश आहे. १३ जणांवर माजलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. 

केज व माजलगावच्या टीमचेही यशस्वी काम 
जिल्ह्यात सुरवातीला कोरोना रुग्णांवर बीडच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. नंतर माजलगाव ग्रामीणसह केज व परळी येथील उपजिल्हा रुग्णालयांतील कोविड केअर सेंटरमध्ये व केजच्या उपजिल्हा रुग्णालयांतही उपचार करण्यात आले. सुरवातीला बीडच्या कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स, कर्मचाऱ्यांनी यशस्वी उपचार होऊ शकतात हे दाखवून दिले. पण, शनिवारी केजच्या दोन रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर केजच्या टीमनेही यशस्वी उपचार करू शकतो हे दाखवून दिले. माजलगावमधूनही रविवारी १३ जणांना डिस्चार्ज होणार असल्याने येथील टीमची मेहनतही दिसून आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten defeated Corona in Beed