
दीड महिन्यापूर्वी काही संस्थांना मिळून दिलेल्या अनुदानाच्या धनादेशासारखा (चेक) हुबेहूब धनादेश तयार करून दहा लाख रूपये हडपण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सतर्कतेमुळे गुरूवारी (ता. १७) उघड झाला.
लातूर : दीड महिन्यापूर्वी काही संस्थांना मिळून दिलेल्या अनुदानाच्या धनादेशासारखा (चेक) हुबेहूब धनादेश तयार करून दहा लाख रूपये हडपण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सतर्कतेमुळे गुरूवारी (ता. १७) उघड झाला. या प्रकरणी सलगरा (ता. लातूर) येथील राजर्षी शाहू महाराज संस्थेसह अज्ञात व्यक्तींच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी सांगितले, की जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांकडून स्वयंसेवी संस्थांना दिव्यांग शाळा तसेच अन्य योजनांसाठी अनुदान दिले जाते. समाजकल्याण विभागाने २९ ऑक्टोबर २०१० रोजी जिल्ह्यातील चार ते पाच संस्थांना मिळून ६२ लाख रूपये अनुदानाचा (पारेपोषण) धनादेश देण्यात आला होता. या धनादेशासारखाच दहा लाखाचा हुबेहूब धनादेश तयार करण्यात आला. धनादेशाचा क्रमांक तोच होता. मात्र, त्यावरील मजकुरात बदल होता. हा बदल सोडला तर धनादेशात थोडाही बदल दिसून येत नव्हता.
हा बनावट धनादेश सलगरा येथील राजर्षी शाहू सेवाभावी संस्थेच्या नावाने होता. क्लोन केलेला हा बनावट धनादेश खरा आहे, असे भासवून अहमदपूर येथील एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून वटवण्यासाठी पाठवण्यात आला. हा धनादेश टपालाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषद शाखेकडे पाठवण्यात आला. जिल्हा बँकेने याची गुरूवारी दुपारी याची माहिती समाजकल्याण विभागाला दिली. जिल्हा समाजकल्याण अधिकारी खमितकर व कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हा धनादेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर श्री. खमितकर यांनी लागलीच याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी बनावट धनादेश तयार करून सरकारची फसवणुक केल्याच्या आरोपावरून राजर्षी शाहू महाराज संस्थेसह अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
संपादन - गणेश पिटेकर