शेळके कुटुंबीयांना दहा लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या कारभारी शेळके यांच्या कुटुंबीयांना महापालिकेतर्फे दहा लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय शनिवारी (ता.११) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. 

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या कारभारी शेळके यांच्या कुटुंबीयांना महापालिकेतर्फे दहा लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय शनिवारी (ता.११) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. 

सर्वसाधारण सभेला सुरवात होताच काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी ‘मुलांना आरक्षण द्या’ अशी चिठ्ठी लिहून कारभारी दादाराव शेळके (रा. विजयनगर, गारखेडा परिसर) यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय मांडला. त्यावर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी यापूर्वीदेखील हुतात्मा काकासाहेब शिंदे, प्रमोद होरे पाटील, उमेश एंडाईत यांना महापालिकेतर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ठरावही घेण्यात आला, त्याचे काय झाले? असा प्रश्‍न केला. त्यावर महापौरांनी मुख्य लेखाधिकारी रा. मा. सोळुंके यांना यापूर्वी जाहीर केलेल्या प्रत्येकी दहा लाखांच्या मदतीचा धनादेश १७ ऑगस्टपर्यंत देण्यात यावेत, असे आदेश दिले व कारभारी शेळके यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत जाहीर केली. 

चोपडे कुटुंबीयांना पाच लाखांचा धनादेश
सिडको एन-आठ येथील नाल्यात पडून चेतन चोपडे या तरुणाचा जून महिन्यात मृत्यू झाला होता. महापालिकेने चोपडे कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार शनिवारी चेतन यांच्या पत्नी सई यांना धनादेश देण्यात आला. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, विरोधी पक्षनेते जमीर कादरी, गटनेते मकरंद कुलकर्णी, माजी महापौर त्र्यंबक तुपे, भगवान घडामोडे, दिलीप थोरात, राज वानखेडे, शिवाजी दांडगे यांची उपस्थिती होती.

Web Title: Ten lakhs of help to Shelke family