दहा हजार विद्यार्थ्यांचे महात्मा गांधींना अभिवादन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

मागील 35 वर्षांत युवक बिरादरीच्या माध्यमातून मी देशभर 1100 पेक्षा जास्त उपक्रम केले. पण, औरंगाबादच्या 10 हजार विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा कार्यक्रम भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा क्षण आहे. 
- पद्मश्री क्रांती शहा, युवक बिरादरी.

औरंगाबाद : सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांनी "वैष्णव जन तो...' ही प्रार्थना गाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केले. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त एमजीएम विद्यापीठात युवक बिरादरी, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो यांच्या सहकार्याने हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. 

औरंगाबाद शहराच्या इतिहासात प्रथमच असा उपक्रम झाला. ग्रामीण भागातून आलेले विविध शाळांचे 2 हजार विद्यार्थी आणि शहरातील विविध महाविद्यालयांतील 8 हजाराहून जास्त विद्यार्थी यात सहभागी झाले. सुरुवातीला गायक नीरज वैद्य, संगीता भावसार यांच्या समूहाने बापूंच्या आवडत्या भजनांचा कार्यक्रम सादर केला. 

या कार्यक्रमास युवक बिरादरीचे पद्मश्री क्रांती शहा, रेखा शहा, महात्मा गांधी मिशनचे उपाध्यक्ष पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त नितीन कदम, डॉ. सुधीर कदम, प्राचार्य प्रतापराव बोराडे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो औरंगाबादचे संचालक निखिल देशमुख, अर्थतज्ञ एच.एम. देसरडा, उद्योजक उल्हास गवळी, गांधी विचारवंत मार्क लिंडले, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोरा, डॉ. अजित श्रॉफ, डॉ. प्रवीण सुर्यवंशी, डॉ.गिरीश गाडेकर, डॉ.अपर्णा कक्कड, प्रा.आशिष गाडेकर, विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. एमजीएमचे अकादमिक महासंचालक डॉ.सुधीर गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अश्विनी दाशरथे, प्रेषित रुद्रवार यांनी केले. 

विविध भाषांतील गीतांनी वेधली मने 

"एक सूर एक ताल' या कार्यक्रमात 50 गायक आणि वादकांच्या समूहाने भारतातील विविध भाषांतील देशभक्तीपर गीते गायली. यात आकाशकेद्दु निंता (कन्नड), भारोतेरी माटीर घोरे (बांगला), एक तुतारी द्या मज आणुनि (मराठी), ढोलीया वे ढोलीया (पंजाबी), इतनी शक्ती हमे देना दाता (हिंदी), मानुहे मानुहोर बाबे (असामी), पारूक्कूळे नल्ला नाडू (तमिळ), अमे गीत गगन ना गाशु (गुजराती) या गीतांचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten Thousand students tributes Mahatma Gandhi