दीडशे कोटींच्या रस्ते निविदा दोन दिवसांत निघणार

माधव इतबारे
शुक्रवार, 1 जून 2018

शहरातील दीडशे कोटींच्या रस्ते कामांच्या रखडलेल्या निविदा दोन दिवसांत काढण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

औरंगाबाद : शहरातील दीडशे कोटींच्या रस्ते कामांच्या रखडलेल्या निविदा दोन दिवसांत काढण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. राज्य दरसूचीतील बांधकामाचे दर कमी झाल्याने नव्याने निविदा काढल्यास महापालिकेची बचत होणार आहे. त्यातून याच रस्त्यांवर साईड ड्रेनची कामे केली जाणार आहेत. 

शहरातील रस्त्यांसाठी शासनाने गेल्या वर्षी जून महिन्यात शंभर कोटींचा निधी दिला होता. त्यात महापालिकेने 50 कोटींची भर टाकत दीडशे कोटींच्या रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला; मात्र निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत एका कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली. सध्या निविदेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यातच माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी राज्य दरसूचीतील बांधकामाचे दर कमी झाल्याने रस्ते कामाच्या फेरनिविदा करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सुमारे 25 ते 26 कोटी रुपये महापालिकेचे वाचतील, असा दावा त्यांनी केला होता. त्यानुसार सर्वसाधारण सभेनेदेखील न्यायालयात याबाबत विनंती करून फेरनिविदा काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. 

रस्त्यांच्या कामाला विलंब होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त केली होती. त्यानंतरही महापालिकेची दिरंगाई सुरूच आहे. 

दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासोबत महापौरांची गुरुवारी (ता. 31) रात्री बैठक झाली. त्यात या निविदा दोन दिवसांत काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

Web Title: Tender roads will go out in two days of rupees 150 crores