तेरणा बंद पाईपलाईन योजना अजूनही प्रतिक्षेतच, सध्या धरण शंभर टक्के भरले

Terna Project
Terna Project

उस्मानाबाद : तेरणा मध्यम प्रकल्प बंद पाईपलाईन पथदर्शी योजना अजुनही प्रतिक्षेतच आहे. या कामाची निविदा प्रक्रिया २००९ - १० मध्ये पूर्ण झाली असे असतानाही अद्यापपर्यंत ही योजना पूर्णत्वास का गेली नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. सध्याच्या स्थितीला धरण शंभर टक्के भरले असल्याने त्याचाही शेतकऱ्यांना फायदा झाला असता महत्त्वाच्या विषयांवर आतातरी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.


तेरणा बंद पाईपलाईन ही योजना गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने आठ फेब्रुवारी २००८ रोजी जाहीर केली होती. तेरणा बंद पाईपलाईन व ठिबक सिंचनाने लाभक्षेत्रास लाभ देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी २३ कोटी लाख रुपये किंमतीपैकी १८ कोटी ६३ लाख रुपये, तसेच जवळपास पाच कोटी अनुषंगिक खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यातील १२ कोटी ५१ लाख रुपयांना तांत्रिक मान्यता मिळाली होती.

२००९-१० मध्ये ही निविदा प्रक्रिया पार पडली. तेरच्या एका कंत्राटदारांना हे कंत्राट मिळाले होते. निविदा अंदाजपत्रकीय दरापेक्षा तब्बल ६९ टक्के अधिक दराने स्वीकारल्याने त्यामध्ये कोणाचे हित साधले गेले हे सांगायची आवश्यकता नाही. दरवेळी टेस्टिंग होणार अस सांगून तेवढेच सोपस्कार करुन ही यंत्रणा पुढे काहीच करत नसल्याचे आजवरचे चित्र आहे. किमान आतातरी ठोस निर्णय होण्याची गरज असून या भागातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळायला हवे अशी जनभावना आहे.


पाण्यासाठी शेतकरी प्रतिक्षेत
गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी या पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत, शेतकऱ्यांच्या तोंडच पाणी पळुन जायची वेळ आली. पण त्यांच्या नशीबाला पाणी अजूनपर्यंत काही मिळाले नाही. धरण उशाला योजनेवर खर्च होऊनही शेतकऱ्यांच्या घशाला कोरड मात्र कायमच आहे. कंत्राटदारास रक्कम सुध्दा देण्यात आलेली आहे. मुळ निविदा किंमत ११ कोटी १८ लाख रुपये असताना कंत्राटदाराला आतापर्यंत ३८ कोटी रुपये या कामापोटी मिळालेले आहेत. तेरसह अनेक गावांना उपयोगी पडेल अशी ही योजना आहे. तेर, रामवाडी, डकवाडी, कोळेवाडी ते पुढे राजुरीपर्यंत ही योजना आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com