बहुरूप्यांच्या कलेचा रंगमंच सदा कोराच

File photo
File photo

नांदेड : अनादिकालापासून समाजात उपेक्षित जीवन जगणारी एक जमात बहुरूपी म्हणून ओळखली जाते. आपल्या कलेतून समाजप्रबोधन करण्याचे काम या समाजातील वंशपरंपरेतील कलाकार करत आहेत. मात्र, हा समाज आजही समाजाच्या प्रवाहापासून कोसो दूर असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतोच. विविध जातीधर्मातील देवदेवतांच्या वेशात गावात फिरून मिळेल त्यावर आपला उदरनिर्वाह करणारा बहुरूपी समाज. आपल्या कलेतून समाजाचे प्रबोधन करणे हाच त्यांचा पारंपरिक व्यवसाय. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. कलावंतामध्ये सुप्त गुण असतात, त्या सुप्त गुणातून इतरांची मने जिंकून आपल्या कलेतून समाज प्रबोधन करणारा बहुरूपी कलावंतांचा समाज. परंतु, शासनाच्या नाकर्तेपणामुळे या समाजाची अवस्था दयनीय असल्याचे वास्तव दिसून येते.

तोकड्या मिळकतीतून उदरनिर्वाह

वंशपरंपरेनुसार बहुरूपी विविध प्रकारचे सोंग घेऊन आपली कला प्रदर्शित करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. नांदेड शहरामध्ये समाजातील काही कुटुंबु वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील कर्ते पुरुष विविध रूपे धारण करून अनेक भूमिका वठवितात. यात सलवार परिधान करून कॉलेज कुमारिका, साडी घालून गृहिणी, गरोदर महिला, पोलिस, डॉक्‍टर, लैला मजनू, शंकर-पार्वती, हनुमान, रामसीता अशी विविध रुपे धारण करून समाज प्रबोधनाचे कार्य बहुरूपी करतात. त्या माध्यमातून मिळणाऱ्या तोकड्या मिळकतीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत आहेत. दिवसाकाठी मिळणाऱ्या अल्पशः मिळकतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलतानाच विविध सोंग धारण करण्याकरिता लागणाऱ्या साधनांचीही तजबीज त्यांना करावी लागते. त्यात मेकअपचे साहित्य व विविध प्रकारचे कपडेही त्यांना खरेदी करावे लागतात.

महिलांना सोंग करण्यास मनाई

वंशपरंपरेने अवगत झालेल्या कलेचा आधार घेऊन उदरनिर्वाहाचे साधन बनविल्याशिवाय बहुरूपयांकडे कोणताच दुसरा पर्याय नाही. विशेष हे आहे की, वंशपरंपरेने अवगत कला असली तरीही महिलांना बहुरूप्यांचे सोंग करण्यास समाजामध्ये मनाई आहे. त्यामुळे फक्त पुरुषच सोंग घेऊन कला सादर करतात. या समाजाचा भटक्‍या जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

बहूरूपी समाजाकडे शेती नाही, कोणतेही दुसरे काम नाही. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांनाही फारसे शिकविले जात नाही. कसेबसे शिक्षण घेतलेच तर शिक्षणानंतर नोकरी नाही. अशा परिस्थितीत कसे जगावे असा प्रश्‍न आहे.  - श्रावण खराटे

आमच्या मुलांनी बहुरूपीचे सोंग घेऊ नये, म्हणून त्यांना उच्च शिक्षित करावयाचे आहे. परंतु शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याने शक्‍य होत नाही. ओढाताण करून शक्‍य केले तर नोकरी मिळत नाही. - अमोल तांदुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com