छोट्या शहरांत नाट्यगृहे हवीतच

रविवार, 22 एप्रिल 2018

लातूर - ‘महाराष्ट्र हा संगीतवेडा, तसा नाटकवेडाही आहे; पण आवश्‍यक सुविधा असलेले नाट्यगृह नसल्याने सांस्कृतिक चळवळ तीथपर्यंत पोचत नाही. म्हणून अशी नाट्यगृहे छोट्या-छोट्या शहरांतही हवीतच,’ असे मत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले. नाट्यगृह नसणे हा गंभीर विषय आहे. या विषयाकडे अध्यक्षीय भाषणातून मी सरकारचे लक्ष वेधून घेईन, असेही त्या म्हणाल्या.

मुंबईत जून महिन्यात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी शिलेदार यांची नुकतीच निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. ग्रामीण महाराष्ट्रात नाट्यगृहांची कमतरता आहे. तर काही ठिकाणी नाट्यगृहांत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे पुणे, मुंबई ही शहरे सोडून इतर शहरांत नाटके सहसा होत नाहीत. हे चित्र बदलविण्यासाठी शिलेदार प्रयत्नशील आहेत. शिलेदार म्हणाल्या, ‘लहान-लहान शहरं व खेड्यांतही शास्त्रीय संगीत, नाटकाचा प्रेक्षकवर्ग आहे; पण नाट्यगृह नसल्याने कलावंतांना तेथे पोचता येत नाही. काही शहरांत नाट्यगृहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अस्वच्छतेमुळे नाकाला रुमाल बांधून कलाकार आणि रसिकांना नाट्यगृहात प्रवेश करावा लागतो. त्यामुळे येथे चांगले वातावरण निर्माण झाले तर कलाकारांचे दौरे इतर शहरांत वाढण्यास मदतच होईल.’

मंगल कार्यालयात झाले नाटक 
गायन आणि अभिनयाच्या माध्यमातून संगीत नाटकात स्वत:ची वेगळी मुद्रा उमटविलेल्या गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा लातूरशी खास ऋणानुबंध आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी लातुरात गायनाची पहिली मैफल झाली होती. त्यानंतर आई जयमाला शिलेदार यांच्यासोबतही अनेकदा त्यांनी लातूरमध्ये नाटकांचे दौरे केले आहेत. ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकांचे प्रयोगही त्यांनी सादर केले. नाट्यगृह नसल्याने मंगल कार्यालयात नाटक सादर करावे लागले होते. त्या वेळी प्रेक्षक मांडी घालून जमिनीवर बसले होते, असे अनुभवही शिलेदार यांनी सांगितले.

Web Title: theater in small towns