अहमदाबादेतील ४० लाखांची चोरी औरंगाबादेत उघडकीस 

सुषेन जाधव
Saturday, 5 December 2020

माळीवाड्याच्या दोघा हमालांना अटक, सोशल मिडीयामुळे गुन्हा उघड

औरंगाबाद : अहमदाबादेतील इलेक्ट्रॉनिक्स होलसेल दुकान फोडून तब्बल ४० लाखांची उपकरणे लंपास करणाऱ्या दोघांना जिन्‍सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. योगेश बाबाजी पुतमाळे (२७), सतीश रेवनाथ बनकर (३०, दोघेही रा. माळीवाडा, औरंगाबाद) अशी त्या अटकेतील आरोपींची नावे आहेत.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
विशेष म्हणजे आरोपींनी अहमदाबादेतील दोघांच्या मदतीने ही चोरी केली असून चोरीचा माल टेम्पोने आणून नाशिकच्या व्यापाऱ्याला विक्री केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चोरीच्या मालापैकी जवळपास १९ लाख ५७ हजार ८२४ रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली. ही कारवाई निरीक्षक यांच्यासह उपनिरीक्षक दत्ता शेळके, पोलीस निरीक्षक जयदेवसिंह वाघेला व टीम अहमदाबाद, सहायक फौजदार संपत राठोड, पोलीस अंमलदार हारुण शेख, नाईक संजय गावंडे, नंदु चव्हाण यांनी केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चोरीप्रकरणी अहमदाबादेत गुन्हा 
अहमदाबादेतील व्यावसायिक जगतभाई नरेंद्र पटेल (४३) यांच्या होलसेल दुकानातून २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री तब्बल ४० लाख रुपये किंमतीची उपकरणे चोरीला गेली होती. या प्रकरणात असलाली पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. दरम्यान, १ डिसेंबर रोजी निरीक्षक केंद्रे यांना औरंगाबादेतील चोरट्यांनी महाराजा कंपनीचे मोठ्या प्रमाणातील चोरीचे मिक्सर नाशिकमधील व्यापाऱ्याला विक्री केल्याची गुप्त माहिती मिळाली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सोशल मिडीयामुळे छडा 
निरीक्षक केंद्रे यांनी सोशल मिडायाचा आधार घेत या गुन्ह्याचा छडा लावण्याची शक्कल लढवली. त्यानुसार चोरीच्या उपकरणाबद्दल मजकूर तयार करत स्वतासह उपनिरीक्षक दत्ता शेळके यांचा मोबाईल क्रमांक टाकून संपर्क करण्याचे आवाहन केले होते. अशा संदेश व्हायरला केला. केंद्रे यांच्या ओळखीचे बडोद्यातील निरीक्षक यांनीही गुजरातेतील ग्रुपवर तो संदेश व्हायरल केला. दरम्यान असलाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक पी. आर. जडेजा यांनी १ डिसेंबर रोजी केंद्रे यांना फोन करून त्याच्या हद्दीत चोरी झाल्याचे सांगून त्यामध्ये महाराजा कंपणीचे मोठ्याप्रमाणात मिक्सर चोरी गेल्याचे कळविले. माहितीची खातरजमा केल्यानंतर जिन्सी पोलिसांशी संपर्क करुन असलाली पोलिसांचे एक पथक २ डिसेंबर रोजी औरंगाबादेत आले. गुजरात पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रे यांनी उपनिरीक्षक शेळके यांचे एक पथक तयार केले. पोलिसांनी माळीवाड्यातून हमाली काम करणाऱ्या योगेश पुतमाळे आणि सतीष बनकरला ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी अहमदाबादेतील साथीदार जुबेर खान आणि जावेद कुरेशी (दोघेही रा.असलाली, अहमदाबाद) यांच्या मदतीने दुकान फोडून साहित्य टेम्पोने आणून ते नाशिकच्या होलसेल व्यापाऱ्याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार जिन्सी पोलिसांच्या मदतीने असलाली पोलिसांनी नाशिक येथून १९ लाख ५७ हजार ८२४ रुपयांचे मिक्सर जप्त केले. त्यानंतर असलाली पोलिस आरोपी व मुद्देमाल घेऊन गुजरातकडे रवाना झाले. 

(Edit-pratap awachar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft 40 lakh from Ahmedabad uncovered in Aurangabad news