कारची काच फोडून साडेचार लाख पळविले 

crime
crime

औरंगाबाद - बॅंकेतून रोख रक्कम घेऊन कन्सल्टंटने त्यांच्या मुलाच्या कार्यालयासमोर कार उभी करताच कारची काच फोडून दुचाकीस्वार चोरांनी साडेचार लाख रुपये पळविले. ही घटना सोमवारी (ता. 25) दुपारी अडीच्या सुमारास घडली. बनावट क्रमांक टाकून दुचाकीचा चोरीसाठी चोरांनी वापर केल्याची बाब समोर आली. गत पंधरा दिवसांतील ही चौथी घटना असून, बॅग लिफ्टिंगच्या सत्रामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली.

 पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, एम. एल. सूर्यवंशी (रा. रोशन हाऊसिंग सोसायटी, गजानन महाराज मंदिर परिसर) सिव्हील इंजिनियरिंग कन्सल्टंट असून, ते कंत्राटदार सचिन रमणलाल कासलीवाल (रा. रामकृष्णनगर, गारखेडा परिसर) यांच्यासोबत आकाशवाणी चौकातील भारतीय स्टेट बॅंकेत खात्यातून पैसे काढण्यासाठी गेले होते. सूर्यवंशी यांनी साडेचार लाख रुपये काढले. ही रक्कम त्यांनी कारच्या चालकाच्या शेजारील सीटसमोरील डॅशबोर्डमध्ये ठेवली. त्यानंतर ते मुलगा साकेत याच्या कार्यालयात जाण्यासाठी पदमपुरा येथे निघाले. मुलाच्या कार्यालयासमोर कार उभी करून ते सचिन कासलीवाल यांच्यासोबत आत गेले. दहा मिनिटांनी दोघेही कार्यालयातून बाहेर पडताच त्यांना चोर कारची डाव्या बाजूची काच फोडून पैसे लांबविताना दिसला. त्यांनी आरडाओरड केली; पण तोपर्यंत चोरांनी दुचाकीने पंचवटी चौकाकडे पलायन केले. घटनेनंतर सूर्यवंशी यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्यासह निरीक्षक रामेश्‍वर रोडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. 
 
ते होते पाळत ठेवून 
आकाशवाणीपासून सूर्यवंशी यांचा चोरांनी पाठलाग केला. कारमधून सूर्यवंशी उतरण्याचीच ते वाट पाहत होते. तशी संधी पदमपुऱ्यात मिळताच चोरांनी कारची काच फोडून पैसे लंपास केले. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी सुरू केली. यात एका सीसीटीव्हीत दोन चोर दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
यापूर्वीच्या घटना 

  • 13 फेब्रुवारी : मोंढ्यातील धान्य व्यापारी सुमतीलाल गुगळे यांची सात लाखांची बॅग चोरांनी लांबविली. 
  • 16 फेब्रुवारी : सिडकोतील डॉ. मनोहर रतनलाल अग्रवाल यांच्या कारमधून ऑईल गळती होत असल्याची थाप मारून पाच लाख रुपये लांबविले. 
  • 20 फेब्रुवारी : पिग्मी एजंट दिलीप शांतीलाल पांडे यांना दुचाकीस्वार चोरांनी मारहाण करून चाळीस हजार व चेक असलेली बॅग हिसकावून नेली. 
  • 25 फेब्रुवारी : सूर्यवंशी यांची साडेचार लाखांची बॅग लंपास. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com