आडस येथे एकाच रात्री सात दुकाने फोडली

रामदास साबळे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

आडस येथे शिवाजी महाराज चौकात अंबाजोगाई रस्त्यावरील मुख्य बाजारपेठेतील संध्या कलेक्शन, आडकेश्वर ट्रेडर्स, आमले हार्डवेयर, ओमसाई कृषी सेवा केंद्र, सतीष अॅग्रो एजन्सी, राधिका टेक्सस्टाईल व माऊली पान सेंटर या दुकानाचे शटर वाकवून दुकानातील तिजोरीतून रोख रक्कम मंगळवारी चोरी करून अज्ञात चोरटे पसार झाले आहेत.

केज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची ही घटना मंगळवार (ता.14) ला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. येथील पोलिस दुरक्षेत्र कार्यालयाच्या काही अंतरावर चोरीच्या घटना घडल्या असल्याने व्यापारी वर्गातून असंतोष व्यक्त केला जात आहे.  

आडस येथे शिवाजी महाराज चौकात अंबाजोगाई रस्त्यावरील मुख्य बाजारपेठेतील संध्या कलेक्शन, आडकेश्वर ट्रेडर्स, आमले हार्डवेयर, ओमसाई कृषी सेवा केंद्र, सतीष अॅग्रो एजन्सी, राधिका टेक्सस्टाईल व माऊली पान सेंटर या दुकानाचे शटर वाकवून दुकानातील तिजोरीतून रोख रक्कम मंगळवारी चोरी करून अज्ञात चोरटे पसार झाले आहेत. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये सदरील चोरटे कैद झाले आहेत. मिळालेल्या फुटेजवरून तीन चोरटे असल्याचे निदर्शनास येत आहे. घटनेची माहिती मिळताच सकाळी धारूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर.आर. मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना माहिती मिळताच त्यांनी दरोडा प्रतिबंधक पथकास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांच्या नेतृत्वाखाली आडस येथे रवाना केले आहे. 

चोरीच्या घटनेचा तपास जलद गतीने होण्यासाठी हाताचे ठसे शोध पथक व श्वानपथकाने घटनास्थळी भेट दिली. मात्र चोरट्यांनी चोरी करताना हातात हातमोजे वापरले होते. तोंडावर काळा कपडा बांधला होता व कुठलाही पुरावा मागे सोडला नाही. यामुळे हे चोरटे सराईत गुन्हेगार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कसलाच पुरावा मागे सोडला नसल्याने चोरांचा तपास लावण्याचे पोलिस प्रशासनासमोर आवाहन आहे. चोरीच्या घटना या पोलिस दुरक्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर घडल्या असल्याने स्थानिक पोलिस रात्री कोणीच सेवेवर कार्यरत नसल्याने या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल व्यापारी वर्गातून असंतोष व्यक्त केला जात आहे. 

या घटनेचा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत सुरू होती. चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Theft at aadas kej in seven shops